कृषी क्रांतीचे जनक वसंतराव नाईक
कृषी क्रांतीचे जनक वसंतराव नाईक
मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत त्यांनी मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा मिळवून दिला. मटका व जुगार बंद करून राज्य शासनाची लॉटरी सुरू केली, महाराष्ट्रात हरितक्रांती, श्वेतक्रांती, फलोत्पादन, औष्णिक विद्युत केंद्राची स्थापना, रोजगार हमी योजना, कापूस एकाधिकार योजना, सिडको-हडको योजना, महाबीज योजना, एम.आय.डी.सी, आश्रम शाळा, धरणांची निर्मिती, नवी मुंबई व नवीन औरंगाबाद ची निर्मिती, महाराष्ट्रासाठी चार कृषी विद्यापीठांना मंजुरी इ. त्यांच्या कारकीर्दीतील कामे उल्लेखनीय आहे.
नाईक साहेबांनी "कृषिक्रांती रक्त सांडण्याची नसून घाम गाळण्याची आहे". असे स्पष्ट सांगितले. भारत देश तसा लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात 1920-21 नंतर लोकसंख्येत झपाट्याने वाढ झाली व होत गेली. परंतु तत्कालीन परिस्थितीत अन्नधान्याचे उत्पादन होत नव्हते कारण तत्कालीन परिस्थितीत वारंवार दुष्काळ पडत होते तत्कालीन काळामध्ये एक-दोन नव्हे तर चार मोठे दुष्काळ पडले होते आणि त्यावेळी सर्व शेतकऱ्यांचा जीवनमान शेतीवरच अवलंबून होता. निसर्गाच्या लहरीपणामुळे अन्नधान्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली होती त्यातही शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करायचा त्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी 1965 साली जी क्रांती झाली ती हरित क्रांती होय. आणि हे घडवून आणण्यासाठी नाईक साहेबांना डॉ. पंजाबराव देशमुख व यशवंतराव चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे त्यांनी अशी शपथ घेतली की, "येत्या दोन वर्षात महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करू शकलो नाही तर मी स्वतः पुण्याच्या शनिवार वाड्यासमोर फाशी घेईल". या वाक्यावरून आपणास असे दिसून येते की त्यांनी कृषी क्रांती हा विषय किती मनावर घेतलेला होता. प्रत्यक्षात नाईक साहेबांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आत्मविश्वास ढळू द्यायचा नव्हता. त्यामुळे शेती शेतकरी व पाणी हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होताच पण त्यांच्या कारकीर्दीतला महत्त्वाचा यश म्हणजे अशा दुष्काळात एकाही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही. (आजची परिस्थिती उलट आहे) आम्ही आजच्या परिस्थितीत महाराष्ट्राच्या जडण-घडणीतील व विचारातील वसंतराव नाईक यांना विसरलो असल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येकडे वळतो आहे असे वाटू लागले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेली जमिनीचे राष्ट्रीयीकरण करण्यासंदर्भातील भूमिका नाईक साहेबांनी कृतीत उतरवली. कसेल त्याची जमीन, कुळ कायदा, जमिनीचे सपाटीकरण,जलसंधारण, मृदसंधारण इ. योजना त्यांनी आखलेल्या होत्या व त्या शेतकऱ्यांना जीवनदायी ठरल्या. नाईक साहेबांनी शेतकऱ्यांना एक सल्ला दिला तो म्हणजे, परंपरागत शेती व्यवसायाबरोबरच आधुनिक शेतीची कास धरावी. तसेच शेतीकडे उपजीविकेचे साधन म्हणून न पाहता त्यांच्याकडे एक व्यवसाय म्हणून पहावा. देश अन्नधान्य मध्ये स्वयंपूर्ण झाला तर दुसऱ्या देशांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी अधिक धान्य उत्पादनासाठी कृषी विद्यापीठाने विकसित केलेले संकरित बियाणे वापरले पाहिजे. त्याचबरोबर संकरित गायीचे संगोपन केले पाहिजे. त्यामुळे शेती व्यवसायाला जोडधंदा प्राप्त होऊ शकतो व शेतकरी सुखी व आनंदी राहू शकतो. नाईक साहेब म्हणतात की, दारिद्रय घालवायचे असेल तर शेती त्याची गुरुकिल्ली आहे. आणि जर का "शेतकऱ्याला पाणी मिळाले की तो चमत्कार करून दाखवितो". त्यासाठी त्यांनी वसंत बंधारा व कोल्हापूरी बंधाऱ्याची निर्मिती केली. शेतकऱ्यांना नाईक साहेबांनी आणखी एक सल्ला दिला, "जमीन पाटाच्या पाण्याने भिजवा, ते जमत नसेल तर डोक्यावरून पाणी आणा आणि तेही जमत नसेल तर घामाने जमीन भिजवा पण जमीन ओली करा". म्हणजेच नाईक साहेबांचा जोर हा शेती बागायती करण्यावर देखील असल्याचा त्यांच्या विचारातून दिसून येतो. आणखी एक सुंदर विचार त्यांनी सांगितलेला आहे. "शेतीत राबण्यासारखे दुसरे सुख नाही आणि पेरलेले शेत पिकाने बहरले की पहायला त्यापेक्षा जगात दुसरे अनुपम सौंदर्य नाही". यावरून नाईक साहेबांचे शेती व शेतकऱ्यांवरचे प्रेम दिसून येते. 
जहागीरदारवाडी (तांडा) येथे जयंती साजरी करताना..
वसंतराव नाईकांनी ज्या-ज्या माध्यमातून या हरित क्रांतीची बीजे रोवली त्यामध्ये प्रामुख्याने ज्वारी एकाधिकार योजना, गहू एकाधिकार योजना, कापूस एकाधिकार योजना, कृषी विद्यापीठांची निर्मिती, श्वेतक्रांती, व फलोत्पादन इ. घटकांवर आधारित ही क्रांती होती. वसंतराव नाईकांनी यामध्ये एक बदल असा केला, पूर्वी वापरले जाणाऱ्या बियाणे यांमध्ये त्यांनी संकरित बियाणे वापरण्याचा सल्ला दिला. त्यामध्ये ज्वारी H-4 व C.S.H-1 हे वाण वापरण्याचा व गव्हामध्ये सोनाली व कल्याण सोना इ. जातीचा प्रयोग केला. त्याचे फळ आज दुसर्याच वर्षीपासून पाहायला मिळू लागले महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ज्वारी व गव्हाचे उत्पादन वाढले मात्र व्यापारी वर्ग 34 रुपये प्रति क्विंटल ज्वारी खरेदी करू लागले व दलाली कमवु लागले हे नाईक साहेबांच्या लक्षात येताच त्यांनी शासनाच्या खरेदी महासंघामार्फत 54 रुपये प्रति क्विंटल ज्वारी ची खरेदी केली. 'शेतकऱ्यांच्या हितासाठी धान्य व्यापारात उतरणारे महाराष्ट्र राज्य पहिले राज्य ठरले' याचे श्रेय नाईक साहेबांनाच जाते. महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात कापसाचे पीक घेतले जाते हे नगदी पीक म्हणून पाहिले जाते वर्षभराची आर्थिक तरतूद या पिकाच्या भरोशावर केली जाते मात्र कापूस खरेदीमध्ये व्यापारी शेतकऱ्यांची लूट करतात हे लक्षात आल्यानंतर 1 ऑगस्ट 1972 साली कापूस एकाधिकार योजना सुरू केली.
तत्कालीन काळामध्ये भारतात शेती उत्पादन वाढीसाठी व आधुनिक तंत्रज्ञानाची शेतीला जोड देण्यासाठी विविध राज्यात कृषी विद्यापीठ असावे असे डॉ. कोठारी आयोगाने सुचवले आणि त्यानुसार महाराष्ट्रात 1968 साली राहुरी जि. अहमदनगर येथे पहिले कृषी विद्यापीठ स्थापन केले. मात्र विदर्भ व मराठवाड्यातून अनेक आंदोलन झाल्यानंतर नाईक साहेबांनी विदर्भाला व मराठवाड्याला कृषी विद्यापीठ मंजूर करून दिले. तसेच प्रादेशिक समतोल बिघडू नये या उद्देशाने कोकणालाही एक विद्यापीठाची मंजुरी दिली याच विद्यापीठांमधून आज शेती उत्पादनासाठी दरवर्षी नव-नवीन संकरित व सुधारित बियाणे जे अधिक उत्पादन देऊ शकतात त्याची निर्मिती होऊ लागली. तसेच त्यांनी श्वेतक्रांती देखील महाराष्ट्रात घडवून आणली व जो महाराष्ट्र दुधाच्या बाबतीत गुजरातवर अवलंबून होता तो महाराष्ट्र आज दुग्धउत्पादनात स्वयंपूर्ण बनला आहे. तसेच त्यांनी संकरित बियाणे व रासायनिक खतांचा वापर करून केवळ अन्नधान्य उत्पादनात नाही तर फलोत्पादन करता येते यासंबंधीही नव-नवीन प्रयोग नाईक साहेबांनी महाराष्ट्रात केले. त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रातील द्राक्षांच्या बागा विदर्भातही फुलवल्या ते फक्त नि फक्त नाईक साहेबांच्या फलोत्पादन धोरणामुळे.
एकूणच महाराष्ट्राच्या जडण-घडणीत व विकासात वसंतराव नाही यांचे अनमोल कार्य आहे. यशवंतराव चव्हाण यांनी दिल्लीकरांना असा निर्वाळा दिला होता की, "महाराष्ट्र हा वसंतराव नाईक यांच्या हाती सुरक्षित असेल". अशा व्यक्तिमत्त्वांनी संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त केला त्याची फळे आज देखील आपण चाकतो आहोत त्यामुळेच त्यांना हरितक्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राच्या विकासाचे शिल्पकार असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्या महान विद्वानाची आज 110 वी जयंती; या जयंतीच्या माझ्या सर्व शेतकरी राजांना व महाराष्ट्रवासीयांना खूप खूप शुभेच्छा.
बळीराम शेषेराव चव्हाण, पीएच.डी राज्यशास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.
मो. 9028446941/42

.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा