राजकारण्यांचा ढोंग आणि भोंग्यांचा सोंग...
राजकारण्यांचा ढोंग आणि भोंग्यांचा सोंग...
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. आज या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अनेक जाती-धर्माचे लोक गुण्या-गोविंदाने नांदताना आपल्याला दिसते. मात्र या सुखी संसारामध्ये आग लावण्याचे काम मात्र राजकारणी मंडळी सातत्याने करताना दिसून येते. या आगीतुन आपली राजकीय पोळी भाजून घेतात हे काही आपल्यासाठी नवीन नाही. विशेषतः आग निवडणूक जवळ आल्यास किंवा निवडणुकीचा काळ चालू असताना अधिक धगधगते, या धगधगत्या आगीत राजकारणी मंडळी व त्यांचे पुत्र/चिरंजीव, कन्या आप्त-स्वकीय हे कधीच या आगीच्या रणांगणात उतरत नाही. उतरतात ते आमचे हिंदू बहुजन पोरं. यातून फायदा तर या बहुजन पोरांचा काही होत नाही; मात्र नुकसान ही अटळ असते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कर्ते-धर्ते व राष्ट्रीय अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवाजी पार्क मुंबई या ठिकाणी सभा घेतली. त्या सभेमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले की, "मशिदीवरील भोंगे खाली घ्यावेच लागतील नाहीतर ज्या मशिदी बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हानुमान चालीसा लावायची" या अशा प्रवृत्तींना आपण सुज्ञ, विचारी व बुद्धिजीवी लोकांनी काय म्हणावे? असा प्रश्न आपल्या समोर पडतो. मात्र हाच प्रश्न गाव- खेड्यातील, शहरातील, मदमस्त, धर्माची नशा, जातीची नशा चढलेल्या (राजकारण्यांनी चढवलेली) तरुणांना मात्र हे समजत नाही उमजत नाही आणि मग ते या राजकारण्यांच्या विधानाला, गर्जनेला बळी पडतात व स्वतःचे नुकसान करून घेतात.
वरील राज ठाकरे यांच्या गर्जनेला प्रत्युत्तर देताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणतात की, "काल शिवाजी पार्कवर भोंगा भाजपचा होता" असे संजय राऊत यांनी सांगितले. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी चे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी देखील आपली भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की तिकडे अमित ठाकरे ला हनुमान चालीसा म्हणायला लावा, तिथे एकही बहुजन पोरगा नकोय. तिकडे जितकी लोक हनुमान चालीसा म्हणायला जातील त्यांनी आपले टी-शर्ट काढून आपले जानवे दाखवावे, एकही बहुजन माणसं नकोय मला. असेच अनेक राजकारणी मंडळींनी आपापल्या सोयीने उत्तर-प्रत्युत्तर या विधानाला केलेले दिसून येतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य दिलेले असताना देखील हे मदमस्त राजकारणी मंडळी आपल्या मर्जी लोकांवर का लादतात? लोकांमध्ये धार्मिक भावना का भडकवतात? हाही प्रश्न निर्माण होतो. यावर शांतपणे विचार केल्यास आपल्या लक्षात येते की जाती-धर्माचे राजकारण होय. यामुळे आपला फायदा कसा होईल, कोणत्या मार्गाने होईल याच्या शोधात हे राजकारणी सातत्याने असतात.
त्यामुळे मी माझ्या सर्व बंधूंना विनंती करेल की, आपण कोणत्याही राजकारण्यांच्या गर्जनेला बळी न पडता, सद्सद्विवेक बुद्धी चा वापर करावा. कोणत्याही जातीय-धार्मिक दंगलीला प्रोत्साहन देऊ नका, स्वतःचे आयुष्य या राजकारण्यांमुळे उध्वस्त करू नका. बंधु प्रिय भावना बाळगून एक समताधिष्ठित समाज म्हणून एकत्र येऊया आणि उज्वल भविष्यासाठी जात धर्माची नशा सोडूया. "सर्वधर्मसमभाव" व "वसुधैव कुटुम्बकम" या विचारानुसार जगूया अश ीच विनंती करेन.
शेवटी एकच सांगेन की, "जगा आणि जगू द्या"....
बळीराम शेषेराव चव्हाण
संशोधक विद्यार्थी
9028446942..

.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा