महाज्योतीत संशोधनाला किंमत शुन्य!!!
महाज्योतीत संशोधनाला किंमत शुन्य!!!
महाज्योतीच्या संचालक मंडळाच्या मिटिंग नुसार अर्थात बोर्ड ऑफ डायरेक्टर यांच्या दिनांक 22/04/2022 रोजीच्या निर्णयानुसार महाज्योती या संस्थेमार्फत पीएच.डी करणाऱ्या म्हणजेच संशोधक विद्यार्थ्यांसाठी जी फेलोशिप योजना आहे, त्या योजनेची नवीन जाहिरात काल दिनांक 1 मे 2022 रोजी जाहीर झाली. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योती असे या संस्थेचा नाव आहे. या संस्थेच्या नावांमध्ये "संशोधन आणि प्रशिक्षण" या दोन शब्दाचा प्रामुख्याने उल्लेख आहे. मात्र महाज्योतीचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांना कदाचित संशोधन आणि प्रशिक्षण या दोन शब्दातला अर्थ कळाला की नाही? असा प्रश्न आम्हा संशोधक विद्यार्थ्यांना पडतो. खऱ्या अर्थाने या संस्थेने संशोधनावरती खर्च करायला हवे; परंतु ही संस्था संशोधन आणि प्रशिक्षण सोडून, शेतकऱ्यांना अनुदान वाटप योजना राबवते. (महाराष्ट्रात कदाचीत कृषी खाते अस्तित्वात नसल्यामुळे) या अनुदानास पात्र शेतकरी कोणते? तर महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील शेतकरी जे महाज्योतीचे अध्यक्ष मा. विजय वडेट्टीवार यांच्या मतदार संघाचा सहित पूर्व विदर्भाचा भाग येतो. जर यांना शेतकऱ्यांना अनुदान वाटप करायचाच असेल या संस्थेमार्फत तर आमच्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना देखील त्यांनी अनुदान दिले पाहिजे. मराठवाड्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना यांनी बिंदास्त अनुदान वाटप करावे. आणि संशोधन मागे ठेवावे.
काल संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन जाहिरात आली. ती जाहिरात वाचल्यानंतर असे लक्षात येते की, 52 ते 56 % लोकसंख्या असणाऱ्या ओबीसी, भटक्या-विमुक्त जाती जमाती व इतर विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी फक्त 200 जागेची जाहिरात काढली. आम्हा संशोधक विद्यार्थ्यांची तर अशी मागणी आहे की आपण या 200 जागा देखील काढू नका. तुम्ही पोलीस भरती, एमपीएससी व यूपीएससी क्लासेस घ्या आणि यांच्यामार्फत दलाली मिळते. इकडे संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्यातून या संस्थेच्या लोकांना दलाली मिळत नाही. त्यामुळे सातत्याने आणि वारंवार महाज्योती अंतर्गत येणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यावर अन्याय अत्याचार करण्याचे काम महाज्योतीचे अध्यक्ष व संचालक मंडळ हे सातत्याने करत आहे.
बळीराम शेषेराव चव्हाण, संशोधक विद्यार्थी, उस्मानाबाद. 9028446942


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा