सावित्री ज्योती व आजच्या स्त्रिया
सावित्री ज्योती व आजच्या स्त्रिया
भारतीय समाज व्यवस्था ही वर्णव्यवस्थेवर आधारित आहे. या वर्ण व्यवस्थेनुसार जातीव्यवस्था निर्माण झाल्या. या व्यवस्थेत स्त्रियांना शुद्रा पेक्षाही हीन वागणूक दिली जायची, त्यांना दुय्यम दर्जा दिला जायचा. मात्र यामध्ये प्रस्थापित सनातनी (ब्राह्मण) लोकांच्या विरोधाला सामोरे जाऊन परिवर्तन घडवून आणण्यासाठी 18 व्या शतकामध्ये महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक व शैक्षणिक क्रांतीची ज्योत पेटवली. अशा सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. 1840 मध्ये वयाच्या 9 व्या वर्षी त्यांचे 12 वर्षाच्या ज्योतिबा फुले यांच्याशी विवाह झाला.
आज 21 व्या शतकामध्ये आपण वावरत आहोत, जगामध्ये अनेक नव-नव्या घडामोडी घडल्या आणि विशेषता: स्त्री जीवनात प्रचंड बदल झालेला दिसतो. कारण यापूर्वी, म्हणजेच शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार होण्यापूर्वी स्त्री म्हणजे प्रजोत्पादनाचे मानवी खेळणे, स्त्री ही पुरुषप्रधान संस्कृतीची दासी, तिने पुरुषाच्या सुखासाठी उभे आयुष्य खर्च करावे, स्त्री शिक्षण घेणे म्हणजे सनातन्यांच्या दृष्टीने धर्म बुडवणे, स्त्री शिकू लागली की ती विधवा होते, त्या घरावर देवाचा प्रकोप होतो, म्हणून तिने फक्त चूल आणि मूल सांभाळावे व आपल्या पतीच्या मर्जी रहावे. अशा नानाविध अंधश्रद्धा या बहुजन, दलित समाजामध्ये प्रस्थापितांनी पेरललेे होते. मात्र या सर्व वायफळ गोष्टींना अपवाद असणारे महात्मा ज्योतिबा फुले यांनी घरातील वडीलधारी माणसांचा व समाजातील प्रस्थापित सनातनी, गावगुंड यांचा विचार न करता त्यांचा विरोध सहन करून परिवर्तनाचे बीज आपल्या घरातून निर्माण केले, पुढे याचेच रूपांतर मोठ्या वटवृक्षात झाले. महात्मा ज्योतिबा फुले यांना वाटत होते की, स्त्रिया जर शिकल्या तर त्यांना त्यांच्यावर होणार्या अन्यायाची जाणीव होईल व त्या अग्नी सारख्या पेटून उठतील. त्यामुळे बुरसटलेल्या समाजातील विचारांमध्ये परिवर्तन होतील या उद्देशाने 1 जानेवारी 1948 रोजी सनातनी लोकांचा माहेरघर असणाऱ्या पुणे येथील भिडे वाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. तत्पूर्वी महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतः सावित्रीबाई फुले यांना आपल्या घरीच शिक्षणाचे धडे दिले होते. मात्र तत्कालीन परिस्थिती अत्यंत दयनीय स्वरूपाची होती. त्या शाळेत येणाऱ्या मुलींना महात्मा फुले यांचे शिकवणे एक प्रकारे सोयीस्कर होत नव्हते. हे ज्योतिबा फुले यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सावित्रीबाईंना बोलून दाखवले की, मुलींना शिकवण्यासाठी महिला शिक्षिका असायला हवे. त्यातून पर्याय पुढे आला तो सावित्रीबाईंचा. परंतु सावित्रीबाई शाळेत शिकवायला जाणे हे ज्योतिबा फुले यांच्या आई- वडिलांना तर मुळात पटलेली नव्हते. ते सांगत असे की, "घरात शिकवलस इथपर्यंत ठीक होतं मात्र तिला शाळेत शिकवायला पाठवायचे नाही". त्यालाही ज्योतीबांनी न जुमानता सावित्रीबाई ला शाळेत शिकवण्यासाठी 'शिक्षिका' म्हणून त्यांची नेमणूक केली. सावित्रीबाई फुले यांनी ते काम तितक्याच आनंदाने देखील स्वीकारले.
त्यांच्या या महान कामाला ब्राह्मणांनी आणि बहुजनांनी सुद्धा प्रचंड विरोध केला. तत्कालीन परिस्थितीत बहुजनांनी बहुजनांना शिक्षण देणे तर दूरच साधे मदत करणे हे पाप होतं. सावित्रीबाई जेव्हा मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जात असे त्यावेळी त्या अंगावरच्या एका लुगड्यात सोबत आणखी एक लुघड सोबत घेऊन जाई. कारण रस्त्यावर सनातनी लोक हे त्यांच्या अंगावर चिखल, माती, शेण, दगड-धोंडे मारायचे त्यामुळे लुघडं घाण होत असे. मग त्या शाळेत जाऊन अंगावरचे लुघडं धुवुन सोबत असणारा लुघडं परिधान करून परत सावित्रीबाई शाळेत शिकवायला जायच्या. तसेच त्यांची कुचेष्टा केली गेली, त्यांच्यावर शिव्या शापांचा भडीमार केला गेला. परंतु या कोणत्याही गोष्टीला न जुमानता त्यांनी शिक्षणाच्या कार्यात थोडाही कसूर केला नाही. तसेच पुढे सावित्रीबाई यांच्या विचारविनिमयातून शाळेचा अभ्यासक्रम तयार केला. त्यामध्ये त्यांनी अधिक भर हा वाचन, शब्दाचे अर्थ सांगणे, व्याकरण, शुद्धलेखन, भूगोल, गणित, मोडी भाषा इत्यादी विषयांवर अधिक भर दिला. त्यांनी बनवलेला अभ्यासक्रम हा शाळेनुसार तयार करण्यात आला होता. त्यामध्ये ग्रामीण व शहरी भागासाठी वेगवेगळा होता. कारण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता यामध्ये खूप मोठा फरक होता. या सर्व बारीक-सारीक गोष्टींचा विचार शिक्षणामध्ये त्यांनी केलेला होता. शिक्षणाच्या व सामाजिक सुधारणेच्या बाबतीत तत्कालीन परिस्थिती अनुकूल नसतानादेखील स्त्रियांसाठी व अस्पृश्यांसाठी शाळा सुरु करणे, समाजातील अनिष्ट प्रथांना विरोध करणे, अशा अनेक कारणांमुळे सावित्रीबाईंना प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्यांनी केलेल्या त्यागामुळे आजची पिढी सुखी समाधानाने शिक्षण घेऊन जगते आहे. विशेषता: मुलींना हे सत्य नाकारून चालणार नाही. 
विद्येच्या देवता सावित्रीबाई फुले यांना मानवंदना करताना..
आजच्या आधुनिक काळातील म्हणजेच 21 व्या शतकातील फॉरवर्ड झालेल्या महिलांना कोणत्या सावित्रीने त्यांना शिक्षण दिले? याचा भान राहिलेले नाही. या स्त्रिया आधुनिक संस्कृतीचा जरी स्वीकार केलेला असला तरी त्यांना किमान त्यांच्या शिक्षणासाठी झगडलेल्या सावित्रीबाईंना तरी विसरता कामा नये, परंतु ते होताना दिसत नाही. आजच्या आमच्या स्त्रिया आपला पहिला प्रेम, आपली ॲनिव्हर्सरी, शाळेचा पहिला दिवस, आपला वाढदिवस, आपल्या मित्र-मैत्रिणीचा वाढदिवस, पहिला पगार, नोकरीचा पहिला दिवस, एवढच काय पहिल्या पगारातून पहिल्यांदा काय खरेदी केलं इत्यादी सर्व गोष्टी लक्षात राहतात किंवा ठेवतात. परंतु त्यांना आठवत नाही ती पहिली शाळा! आठवत नाही तो भिडे यांचा वाडा! आठवत नाही पहिले शिक्षक! आठवत नाही पहिली शिक्षिका! आठवत नाही आपल्याच परिवर्तनाचा इतिहास.
आजही आमच्या स्त्रियांवर सनातन्यांनी लादून दिलेली विद्येची देवता सरस्वतीच आठवते. (जिचे शिक्षणात काही कार्य नाही) पण जिने याच विद्येसाठी दगड-गोटे, शेण, माती, चिखलाचा मार सहन केला. ती सावित्री आठवत नाही. किंबहुना आजच्या शिकलेल्या तरुणी, महिला ह्या देखील एखाद्या व्यासपीठावरून बोलताना विद्येची देवी सरस्वती म्हणून सांगतात, तेव्हा आम्हाला आमच्या शिक्षणाची लाज वाटायला लागते. परंतु हे सुध्दा होताना दिसत नाही. आमची शिकलेली स्त्री ही पौराणिक कथेतील वटसावित्रीची पूजा करेल, पण सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करणार नाही. आजची आमची स्त्री सासू-सुनेच्या भांडणाच्या मालिका पाहतील पण ती स्त्री सत्यघटनेवर आधारित असणारी 'सावित्रीज्योती' सारखी मालिका पाहणार नाही. (ही मालिका किती महिलांनी पाहिली हा एक प्रश्नच आहे) ही मालिका अर्ध्यात बंद पडली तेव्हा किती महिलांनी यांच्या विरोधात आवाज उठवला? तर एकही नाही. आमची स्त्री संपूर्ण मार्गशीष महिना दर गुरुवारी पैराणीक देवीची पूजा-पाठ करेल, मंत्राचे, आरतीचे वाचन करेल परंतु तीच स्त्री सावित्रीबाई फुले, माँ जिजाऊ साहेब, राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर यांच्या एखाद्या ग्रंथाचे वाचन करणार नाही. आजची तरुण पिढी शिकली मात्र त्यांना खऱ्या जीवनाचा, वास्तविक परिस्थितीचा भान राहिला नाही. त्यामुळे 18 व्या शतकातील सावित्री व 21 व्या शतकातील सावित्री यांच्यामध्ये सांस्कृतिक दृष्ट्या,शैक्षणिक दृष्ट्या बरेच बदल झाले. मात्र वैचारिक दृष्ट्या शून्य राहिलेल्या दिसून येतात. त्यामुळे यांची तुलना सावित्रीबाई यांच्याशी करणे शक्य नाहीच. किमान आजच्या स्त्रीने सावित्रीबाई यांनी केलेल्या कष्टाचे फळ म्हणून तरी किमान धार्मिक गोष्टीकडे लक्ष न देता, सत्याधारित व नैतिकतेला पटतील अशाच गोष्टी कराव्या. प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करावी ही छोटीशी अपेक्षा व येणाऱ्या 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती नंतर तरी आमच्या महिलांनी सावित्रीबाई फुले यांना समजून घेतील. सावित्रीबाई यांचे विचार आत्मसात करतील एवढीच अपेक्षा आहे.
बळीराम शेषेराव चव्हाण
संशोधक विद्यार्थी (पीएच.डी राज्यशास्त्र)
उस्मानाबाद.
9028446942


खूप छान
उत्तर द्याहटवाThank you sir...
हटवाछान मांडणी केली बळीरामजी
उत्तर द्याहटवाThank you sir
हटवास्त्रियांनी सावित्रीबाई फुले यांचे चरित्र वाचल्या नंतर नक्कीच त्यांच्यात बदल होतील.
उत्तर द्याहटवातुमचा लेख थोडक्यात असून प्रेरणा देणारा आहे.