आम्ही भारतीय लोकशाहीतले गोर बंजारा लोक

गोरबंजारा समाजाचे राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक  वास्तव मांडणारा अनमोल ग्रंथ!

आम्ही भारतीय लोकशाहीतले गोर बंजारा लोक.

लेखक- बळीराम शेषेराव चव्हाण.

      संपर्क- 9028446941/42 

✍️समीक्षक - याडीकार पंजाबराव चव्हाण, पुसद- 9421774372

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


      गोरबंजारा समाजातील नवोदित लेखक- बळीराम शेषेराव चव्हाण यांनी आठवणीने आम्ही भारतीय लोकशाहीतले गोर बंजारा लोक हे पुस्तक मला समीक्षा करिता पाठवले. सदर पुस्तकाचे वाचन केले असता गोर बंजारा समाजाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक स्थितीचे वास्तव  मांडणारा हा अनमोल  ग्रंथ असल्याचे पानोपानी दिसुन आले. गोरबंजारा समाजात अनेक नवोदित लेखक/ कवींनी मागील दोन तीन वर्षात अत्यंत चांगली पुस्तके प्रकाशन करण्याचा सपाटा लावलेला आहे. यामध्ये लेखक बळीराम शेषराव चव्हाण यांचे आम्ही भारतीय लोकशाहीतले गोर बंजारा लोक या अनमोल ग्रंथाची भर पडलेली आहे. 15 ऑगस्ट 2022 रोजी प्रकाशन झालेले हे पुस्तक कमी काळातच सर्व दूर पोहोचल्याचे अनेक वेळा दिसून आलेले आहे. सदर  पुस्तकामध्ये आम्ही लोकशाहीतले लोक, इतिहासात बंजारा, रोमा जिप्सी आणि बंजारा समाज, बंजारा समाज सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक स्थिती, बंजारा समाज ऊसतोड कामगार, बंजारा समाजाची राजकीय वाटचाल, बंजारा समाजाच्या सरकारकडून अपेक्षा असे अत्यंत दर्जेदार सात प्रकरणे असून अभ्यासपूर्ण प्रस्तावना डॉक्टर ह.नि. सोनकांबळे यांनी लिहिलेली आहे. आकर्षक मुखपृष्ठ  राजानंद सुरडकर यांनी रेखाटले आहे.  लेखक  बळीराम  चव्हाण यांनी आम्ही लोकशाहीतले लोक या पहिल्या प्रकरणात अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिलेली असून  25 नोव्हेंबर 1947 रोजी संविधान सभेतल्या  भाषणामध्ये, लोकशाही संबंधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय म्हटले होते ? हे अत्यंत सविस्तरपणे मांडून तमाम बहुजनांना संविधानाचे महत्त्व पटवून दिलेले आहे. या सोबतच लोकशाहीची व्याख्या, लोकशाही यशस्वीतेसाठी आवश्यक असणारे घटक, बंजारा समाज आणि घटनात्मक स्थिती, आतापर्यंत भटक्या विमुक्त जमातीतील लोकांना घटनात्मक सवलती मिळाल्या पाहिजे त्यासाठी नेमलेल्या समित्या, भारतीय राज्यघटनेचा सरनामा, मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे इतर तरतुदी बाबतची सखोल अभ्यासपूर्ण माहिती देऊन बंजारा समाजावर कसा अन्याय झालेला आहे. हे आकडेवारी सह त्यांनी या पहिल्या प्रकरणात पटवून दिलेले आहे.  एवढेच करून ते थांबले नाही तर महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त आरक्षणाची विभागणी, रेणके आयोगाच्या शिफारसी, भिकू दादा इदाते आयोगाच्या शिफारसी या सर्व शिफारसीचा  उहापोह करून गोर बंजारा समाजाच्या व्यथा आणि वेदना  त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण मांडलेल्या आहे.  इतिहासात बंजारा या दुसऱ्या प्रकरणामध्ये बंजारा शब्दाचा अर्थ, बंजारा समाजाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, सिंधू संस्कृती आणि बंजारा समाज...

आम्ही भारतीय लोकशाहीतले गोर बंजारा लोक..


सिंधू नदी रे पाळेमस, सप्तसिंधुरे राळेम आर्य दामडिया दामड लगा गेरे मार सेना नायक।

     हे जे लोकगीत आहे या लोकगीतातून बंजारा जमात  सिंधू संस्कृतीत होती. आणि सिंधू संस्कृती बद्दल  प्रसिद्ध लेखक गबरूसिंह राठोड यांनी इसवी सन पूर्व 5000 वर्षापूर्वी सिंधु  घाटीची म्हणजे मोहनजोदडो व हडप्पा यास विशाल ,सुंदर स्वच्छ समृद्धी संस्कृतीच्या निर्मात्यापैकी गोरबंजारा समाज हा प्रमुख समाज आहे. बाबतची माहिती देऊन मध्ययुगीन बंजारा समाज मध्ये 


रंजन का पानी छप्पर का घास, दिन के तीन खून माफ और जहाँ आसफखान के घोडे  वहाँ जंगी- भंगी के बैल खडे।


जंगी आणि भंगी नायक  यांना असफखाँन यांनी दिलेल्या ताम्रपटावरील ओळी त्यांनी उद्रृत केलेल्या आहेत. लकीशा बंजारा/ लाखा बंजारा..


तू ही लखी बंजारा, तांडा तेरा भारी है।  गाफिल दिल मे मत रहना, तू बहुत बडा बेपारी है।


असा ऐतिहासिक आणि गौरवशाली गोरबंजारा समाजाचा इतिहास त्यांनी मांडलेला असून छत्रपती शिवाजी महाराज आणि  बंजारा समाज, बाजीराव पेशवा व गोरबंजारा समाज, ब्रिटिश कालीन बंजारा समाज, ऐतिहासिक बंजारा लमाण मार्ग आणि लमाण मार्गाविषयाच्या नोंदीमध्ये गोर बोली भाषेत रूढ असलेली नावे प्रदेशावरून कशा ओळखली जायची ती सुद्धा यादी त्यांनी दिलेली आहे. जसे खेराळी- कर्नाटक राज्याचा प्रदेश, तलगाणो- तेलंगणा, लांबीताडी- भारताची पश्चिम ते दक्षिण किनारा, सेर- भागा नगरचा सुभा किंवा आंध्रा, बावन बराड- वऱ्हाड ,देश मावळा-  मध्य भारत ,गादीतकत- पुणे शहराचा पेशवाईचा भाग, साबर घाटी -गुजरात किंवा साबरमतीचे खोरे, डली लाहोर- दिल्ली ते लाहोर उत्तर भारताचा भाग या व्यतिरिक्त नेपाळ, ब्रह्मा, चीन इत्यादी शेजारील देशातून बंजारा लोकांनी अन्यधान्य  आणण्याचे अनेक उल्लेख सर्वत्र सापडतात. याबाबतची विस्तृत माहिती त्यांनी या प्रकरणात देऊन बंजारा समाजाची लोकसंख्या, महाराष्ट्रातील बंजारा समाजाच्या लोकसंख्येविषयी अंदाज तक्ता क्रमांक 2-1 आणि तक्ता क्रमांक 2-2  मध्ये त्यांनी सन 1911 ते  सन 2021 पर्यंत चे टोटल आकडे दिलेले आहेत. गुन्हेगार जमातीचा कायदा 1871 या सर्व माहितीवरून लेखकांचा अभ्यास दांडगा असल्याचे  पुस्तक वाचतांना  दिसते.  लेखकांनी हे पुस्तक जवळपास 61 पुस्तकाचा सविस्तर आणि सखोल अभ्यास करून लिहिल्याचे वाटते.  त्यामुळे गोर साहित्यातील लेखकाची उंची आपोआपच वाढलेली आहे. लेखकांनी गोरबंजारा समाजाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक ,आर्थिक आणि शैक्षणिक विषयाचे वास्तव  दर्शन तमाम गोरबंजारा समाजाला घडावे हा एकमेव उद्देश मनी बाळगून त्यांनी या पुस्तकाचे निर्मिती केल्याचे माझे प्रामाणिक मत आहे.

        गुन्हेगार जमात, कायद्याने भूमिपुत्र कसे गुन्हेगार झाले. याविषयी गुन्हेगार जमातीचा कायदा जवळपास 360 कलमा मधून त्यांनी गुन्हेगारी जमात कायद्या मधील कलम -3,10,13, कलम-3 , 11, 12, कलम -11, 12, कलम-16, 23, 28 ,कलम-106, 107, 109, 111 याबाबतची माहिती सुद्धा त्यांनी अवगत केलेली आहे. त्यासोबतच सेटलमेंट कायदा याची सुद्धा त्यांनी जाणीव करून दिलेली आहे. लेखक बळीराम चव्हाण यांचे या पुस्तकात चौफेर लिखाण असून बंजारा समाजातील आडनावाची उत्पत्ती व बंजारा उपजाती मध्ये जांगड, भाट किंवा ढाडी, ढालिया, धाडी जमातीचे कुळे सणार नावी ची माहिती देऊन विवाहाच्या प्रसंगी नृत्य गायन करत असतानाऱ्या  गीताची सुद्धा त्यांनी नोंद घेतलेली आहे.


मारे बापूरे घर लसणेरो वाफा, जोए  लसण बोटीमां, मारी याडीरो रो जीवडा बेटीमां. 


      या पुस्तकाची विशेषता म्हणजे आतापर्यंत ज्या ज्या लेखकांनी ऐतिहासिक पुस्तके लिहिलेली आहेत त्यामध्ये गोरबंजारा समाजाचाच उल्लेख होता आणि ते करतात. परंतु लेखक बळीराम चव्हाण यांनी आपल्या तिसऱ्या प्रकरणांमध्ये रोमा जिप्सी आणि बंजारा समाजाचा सविस्तर अभ्यास करून त्यांनी जिप्सी हे लोक केंव्हा कोणत्या देशात पोहोचले याची सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे. ते बघूया स्पेन- 1484, जर्मनी- 1468 ,हॉलंड -1524, पोर्तुगाल-1526, इंग्लंड- 1530, डेन्मार्क -1536 ,फ्रान्स -1536 ,स्कॉटलंड -1541, पोलंड- 1557 आणि स्वीडन 16 37 मध्ये रोमा जिप्सी बंजारा पोहोचलेले आहे. दुसऱ्या महायुद्धात पृथ्वीराज चव्हाण आपापसातील भांडणामुळे पराभूत झाला. याचा सुद्धा संदर्भ लेखकांनी या प्रकरणात दिलेले असून जिप्सी बंजारा ची अनुवंशिकता, रोमा जिप्सी गोरबंजारा वंशाचे नाहीत असे सांगणारे प्रसिद्ध लेखक प्रा. मोतीराज राठोड यांच्या उताराचाही दाखला इथे देण्यात आलेला आहे. तसेच विश्वकोशात जिप्सीची माहिती, तांडा संस्कृती, सण प्रथा संस्कार याबाबतची  सुद्धा माहिती सविस्तरपणे लेखकांनी या प्रकरणात मांडून या  ग्रंथाची उंची वाढवलेली आहे. 

     लेखक बळीराम चव्हाणचा लिहिण्याचा रुख बंजारा समाजातिल  सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक स्थितीबाबतचा असल्यामुळे त्यांनी याबाबत स्पेशल एक चौथे प्रकरण यामध्ये समाविष्ट केलेले असून त्यांनी आकडेवारीसह आणि तक्त्यामध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण सामाजिक सांस्कृतिक स्थितीचे विश्लेषण त्यांनी मांडलेले आहे. लमान, मराठा, महार या लोकांचा तुलनात्मक शेकडा प्रमाण देऊन त्यांनी आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक स्थितीचे विश्लेषण विस्तृतपणे मांडल्यामुळे ही परिस्थिती बघून वाचकाच्या अंगावर काटे आल्याशिवाय राहत नाही. गोरबंजारा समाजाची शैक्षणिक स्थिती भयावह असल्याचे मनोमन हे प्रकरण वाचल्यानंतर पटते. त्या सोबतच आर्थिक स्थितीचे तकत्त्यासह मांडणी  केलेली असून ऊस तोडणी कामगारांचे सुद्धा त्यांनी या प्रकरणात माहिती देऊन प्रकरण पाचव्या मध्ये बंजारा समाज ऊसतोड कामगार याबाबतची माहिती देताना त्यांनी भारतातील साखर उद्योग, महाराष्ट्रातील साखर उद्योग, शैक्षणिक समस्या, ऊसतोड  कामगारांचा प्रश्न, ऊसतोड मजुरांच्या मुलांना चांगले शिक्षण का मिळत नाही? असा प्रश्न समाजव्यवस्थेला  या पुस्तकातून लेखक विचारतो आहे. त्यासोबतच आरोग्याची समस्या, आर्थिक दुर्बलता, सामाजिक दर्जा आणि ऊसतोड मजुराच्या पाल्यावर होणाऱ्या परिणामाची सखोल मांडणी करून त्यावर उपाययोजना सुद्धा त्यांनी सुचवलेल्या आहेत. यावरून गोरबंजारा समाजाविषयी असलेली लेखक बळीराम चव्हाण यांची तळमळ दिसून येते. 

       बहुदा गोरबंजारा समाजाचे लेखक हे तांड्यातून प्रचंड वेदना आणि दुःख सहन करून घडलेले आहेत. त्यांच्या व्यथा, वेदना या मन हेलावून टाकणाऱ्या आहेत. त्यामधुन  लेखक बळीराम चव्हाण कसे सुटतील?  लेखक  तांड्यातील दुष्काळ, उपासमारीचे  चटके सहन करणारा एक सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे त्यांनी तांडयाच्या  व्यथा, वेदना अत्यंत  परखडपणे या पुस्तकात  त्यांनी पीएचडी धारकाला भी  लाजवेल अशा प्रकारचा हा शोध प्रबंधातुन त्यांनी मांडलेल्या आहेत.  असे म्हटले तर ते वावगे होणार नाही. गोरबंजारा समाजाच्या  इतिहासाबरोबर बंजारा समाजाची राजकीय वाटचाल याबाबत लेखक बळीराम चव्हाण आपल्या सहाव्या प्रकरणांमध्ये लिहतांना राज्यात विशिष्ट अधिकार आणि कर्तव्य असलेली व्यक्तीच नागरिक होऊ शकेल. गुलाम, कष्ट करणारे नौकर, लहान मुले व परदेशी लोक यांना नागरिक म्हणता येणार नाही. राज्यकारभारात जो भाग घेतो. तोच नागरिक होय. असे ते पटवून देतात.            राजकीय विकास, राजकीय विकासाचा अर्थ, राजकीय सामाजिकी करणापासून अलिप्त बंजारा समाज, उस्मानाबाद जिल्ह्यातील सध्याची राजकीय परिस्थिती, जिल्हा परिषदेतील व पंचायत समितीतील बंजारा समाजाचा सहभाग, ग्रामपंचायत ,अशा विविध विषयावर त्यांनी प्रश्न तयार करून तक्ता क्रमांक-6-1  ते6-13 मध्ये त्यांनी अनेक प्रश्नांचा  प्रतिसाद व शेकडा प्रमाण त्यांनी नमूद करून सर्वांना आश्चर्यचकित केलेले आहे. यावरून लेखक बळीराम चव्हाण यांचा दांडगा अभ्यास दिसून येतो. लेखकांनी सहा प्रकरणात विस्तृत माहिती दिल्यानंतर बंजारा समाजाच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत? या सातव्या प्रकरणात त्यांनी प्रस्तावनामध्ये बंजारा समाजातील राजकीय नेते महानायक वसंतराव नाईकसाहेब, जलनायक सुधाकरराव नाईक साहेब यांची माहिती देऊन गोरबंजारा समाजाची चालीरीती, रूढी ,परंपरा, देवधर्म, पूजाअर्चा, वेशभूषा ,केशभूषा,  राहणीमान इत्यादी बाबतीत बंजारा समाज हा खूप वेगळा आहे. गोर बंजारा समाज निसर्गपूजक असून मात्र व्यवस्थेने यांच्या संस्कृतीमध्ये देव देवतांना घुसून पूजाअर्चा मध्ये बदल घडवला असेही लेखकाने या ठिकाणी नमूद केल्यामुळे  लेखक हे परिवर्तनवादी, विज्ञानवादी  विचाराचे असल्याचे दिसून येते. गोरबंजारा हा मुळात स्वच्छंदी जीवन जगणारा आहे. म्हणून बस्ती बस्ती पर्वत पर्वत गाता जाए बंजारा, लेकर दिल का एक तारा अशी कल्पना बंजारा शब्दाची केली गेली आहे. विशेषता भारतीय चित्रपटात बंजारा जीवनशैलीचे चित्रण केले गेलेले आहे. या सर्व गोष्टी मांडताना लेखक बळीराम चव्हाण यांनी बंजारा समाजातील प्रश्न, समस्या आणि त्याचे निष्कर्ष हे सुद्धा आकडेवारी सर दिलेले आहेत. केवळ लेखक प्रश्न, समस्या याचे रणगाडे मांडून थांबत नाही. तर लेखकांनी शासनाकडून काय अपेक्षा आहेत याबाबतचा सविस्तर आढावा सुद्धा त्यांनी या सहाव्या प्रकरणात घेतलेला आहे. एकंदरीत हे पुस्तक गोरबंजारा समाजाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थितीचे वास्तव  मांडणारा अनमोल ग्रंथ आहे.       गोरबंजारा समाजाच्या माध्यमातून विविध कालखंडात महत्त्वपूर्ण योगदान राहिलेले असून या जमातीच्या नेतृत्वाने सर्व धर्म व पंतात तन-मन -धन आणि बलिदानाने योगदान दिलेले आहे. सिंधू संस्कृती जैन, बुद्ध, मौर्य, राष्ट्रकूट, मुस्लिम कालखंडामध्ये व रचपूती रियासत्तेमध्ये सुद्धा लोकशाही समृद्ध करण्यात गोरबंजारा समाजाने मोठा वाटा उचललेला होता. अनाथ पिडिक, तपसू- भिल्लक, राय  बिंजरावत,हेमचंद्र बंजारा,शहिद मानसिंग, गोविंद गुरु, वसंतराव नाईकसाहेब, सुधाकरराव नाईकसाहेब  हे लोकशाहीचे कट्टर पुरस्कर्ते होते. असे मत मलपृष्ठावर प्रसिद्ध लेखिका डॉ. सुनिता अशोक पवार यांनी मांडलेले आहे आणि ते अगदी योग्य आहे. लेखक बळीराम चव्हाण हा अनेक चळवळीशी नाते सांगणारा संशोधक तथा कार्यकर्ता असून गोरबंजारा समाजातीलच नाही. तर तमाम बहुजन चळवळीतील पदाधिकाऱ्यांनी हे पुस्तक वाचलेच पाहिजे असे मला मनापासून वाटते. पुस्तकरुपी हा गोरबंजारा समाजाचा राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थितीचे वास्तव  मानणारा हा  अनमोल  शोध प्रबंध एखाद्या विद्यापीठात अभ्यासला जावा. अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. नव्यादमाचे लेखक बळीराम चव्हाण यांच्या मनातील घालमेल ही बंजारा समाजाला न्याय देणारी असून ग्रामीण जीवन सुकर करणारी आहे. आजवर गोर साहित्यात अनेक पुस्तके आली. परंतु आम्ही भारतीय लोकशाहीतले गोर बंजारा लोक हे सर्वात नवे आणि दमदार पुस्तक आहे. लेखक बळीराम चव्हाण हा सवेदंनशील आहे. साक्षीभावाने पाहणारा तरी स्वतःचे मत स्पष्ट मांडणारा आहे. आणि संकल्पनाची उलट तपासणी करण्याची धमक दाखवणारा  आहे. त्यामुळे तो अभिनंदनच पात्र ठरतो.  एक दिवस तुम्ही आम्ही असणार नाही. परंतु लेखक बळीराम चव्हाण यांनी व्यक्त केलेले हे अनमोल विचार  कधीही नाहीसे होणार नाहीत. गोर साहित्यात एका वेळी एकच नाही. तर अनेक विषयाचा सखोल माहिती देणारा एक यशस्वी लेखक म्हणून त्यांची सर्व दूर ख्याती व्हावी अशी मी संत सेवालालबापू चरणी प्रार्थना करतो! आणि थांबतो!!

पेज - 176 

प्रकाशक - श्री के. एस. अतकरे कैलास पब्लिकेशन, औरंगपुरा छत्रपती संभाजीनगर.

स्वागतमुल्य -  240 / रुपये


✍समीक्षक-याडीकार पंजाबराव चव्हाण, पुसद- 9421774372

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंजारा समाजाला ST आरक्षण मिळावे

सावित्री ज्योती व आजच्या स्त्रिया

कृषी क्रांतीचे जनक वसंतराव नाईक