अस्थिर महाराष्ट्र...!

 अस्थिर महाराष्ट्र...!

       महाराष्ट्र राज्य हा संत परंपरेचा वारसा सांगणारा राज्य आहे. या महाराष्ट्राच्या भूमीत संत चोखामेळा, संत ज्ञानेश्वर, संत सावता माळी, संत तुकाराम, संत एकनाथ, संत गोरा कुंभार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा व संत सेवालाल महाराज इ. विविध जाती-धर्मातील, पंथातील संतांनी या विषमतामुलक समाज रचनेवर वेळोवेळी आपल्या अभंगातून प्रहार केला. शिवाय महाराष्ट्र हा एक पुरोगामी विचारांचा देखील मानला जातो. या पुरोगामी विचार प्रवाहामध्ये आपण महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छ. शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इ. अनेक सुधारकांचा समावेश करतो. त्यांनी भारतीय समाजरचनेतील या रुढीवादी, अंधश्रद्धाळू, सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या समाजात आपल्या विचारांच्या माध्यमातून नवचैतन्य निर्माण केले. त्यामुळे आपण पुरोगामी या शब्दाचा विचार केल्यास असे दिसते की, 'पुर:' म्हणजे 'पुढे' आणि 'गामि' म्हणजे 'जाणारा' याचाच अर्थ असा की पुढे जाणारा. (महाराष्ट्र)

      महाराष्ट्र हा भारत देशामध्ये सुधारणेच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. जिथे लोकांमध्ये शांतता, बंधुभाव, स्वातंत्र्य व समता प्रदान करणारा राज्य म्हणून ओळख पावलेल्या या महाराष्ट्रात आज नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे. महाराष्ट्रामध्ये २०१४ ला सत्ता बदल घडून आला. त्यानंतर अनेक स्थित्यंतर झाले. मग ते राजकीय दृष्ट्या असेल, सामाजिक दृष्ट्या असेल, आर्थिक किंवा शैक्षणिक दृष्टिकोनातून असेल! असे अनेक घटकांमध्ये बदल घडून आले. २०१४ चा सत्ता बदल हा राजकीय दृष्ट्या सर्वात मोठा स्थित्यंतर मानायला काही हरकत नाही. सामाजिक दृष्टिकोनातून विचार केला असता अधिक प्रभावीपणे समोर आलेले 'कोपर्डी' प्रकरण असेल. कोल्हापूर येथील औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचं कथीतरीत्या उदात्तीकरण करणारे स्टेटस ठेवल्यामुळे झालेला राडा असेल किंवा नांदेडमध्ये दलित समाजातील तरुणाची हत्या असेल इ. अनेक घटना घडल्या व आणखी रोज कुठे ना कुठे घडत आहेत. 

      आज आर्थिक दृष्ट्या मागासलेला मराठा समाज म्हणून मनोज जरांगे पाटलांनी आरक्षणासाठी चालू केलेला लढा, हा अत्यंत महत्त्वाचा स्थित्यंतर मानता येऊ शकतो. शिवाय दुसरा एक स्थित्यंतर आत्यंत महत्वाचा आहे. तो म्हणजे, शैक्षणिक दृष्ट्या मराठा समाजाच्या उन्नतीसाठी सारथी सारखी संस्था २०१८ मध्ये स्थापन करून अनेक विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित प्रशिक्षण व संशोधन कार्यासाठी देखील शासनाकडून मुबलक खर्च करण्यात येत आहे. तसेच मराठा कुणबी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी सारथी व महाज्योती अशा दोन्हीही संस्थेचा फायदा घेत असल्याचा देखील सातत्याने आरोप होत असतो. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेत असताना ज्या शैक्षणिक संस्था आहे; यामध्ये भरमसाठ फीस असल्याचा आरोप देखील होत असतो परंतु या संस्थाही याच समाजातील प्रस्थापित लोकांच्या हाती आहे. आपल्याच समाज बांधवांनी शिकून पुढे जावे यासाठी या प्रस्थापित वर्गाकडून कोणतीही सवलत देण्यात येत नाही. या आरक्षणाचे जर पाळेमुळे शोधण्याचा आपण प्रयत्न केला तर ते आपल्याला स्व.अण्णासाहेब पाटील यांच्या २२ मार्च १९८२ च्या आंदोलनापासून ते आज मनोज जरांगे पाटील पर्यंतचा प्रवास दिसून येतो. मराठा समाजाच्या आरक्षणासाठीची खरी लढाई ही कोपर्डीच्या बलात्कार प्रकरणानंतर सुरू झाली. याचाच परिणाम असा झाला की, मराठा समाजाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शांततेच्या मार्गाने एकूण ५८ मोर्चे काढले. यामध्ये प्रामुख्याने बलात्कारी तरुणाला फाशीची शिक्षा व्हावी ही मागणी होती. या घटनेनंतर त्याचे स्वरूप बदलुन राजकीय झाले. त्यातुन आरक्षण या नावाने तोंड वर काढले. सध्याच्या परिस्थितीत मराठा समाज ओबीसी मधून "कुणबी प्रमाणपत्राची" मागणी करत आहे; तर दुसरीकडे सकल ओबीसी समाजामधून यास तीव्र विरोध देखील केला जात आहे. याशिवाय महाराष्ट्रामध्ये ठीक-ठिकाणी धनगर, बंजारा व आदिवासी समाजाचे देखील आमरण उपोषण सुरू आहे. धनगर व बंजारा समाजाला आदिवासी समुदायांमध्ये समावेश करावा म्हणून लढाई सुरू आहे; तर आदिवासी समाज हा इतरांना वाटेकरी होऊ देणार नाही अशी भूमिका घेऊन आंदोलन करत आहे. यामुळे सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्राचे वातावरण हे दुषीत व अस्थिर स्वरूपाचे होत चाललेले आहे; जे की कधीच नव्हते.


     मराठा समाज हा पूर्वापार प्रस्थापित (मुबलक शेती) समाज म्हणून गणला जातो. मात्र उत्तरोत्तर ही परिस्थिती बदलल्याचेही चित्र थोड्याफार प्रमाणात दिसून येते. मराठा समाज जर ओबीसी मध्ये आला तर ज्या ओबीसी समुदायातील गावगाड्यांमध्ये, खेड्यामध्ये, गावकुसाबाहेर व डोंगरदऱ्यामध्ये राहणाऱ्या भटके-विमुक्तांसह ओबीसी समुदायांना अशी भीती सतावत आहे की, हा प्रस्थापित समाज इकडे आल्यास यांना राजकीय दृष्ट्या बेदखल केले जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थेत यांना निवडणूक लढण्यासाठी अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागेल. या शिवाय मराठा समाजाकडे सर्व सहकारी संस्था, सहकारी दूध डेअरी, कारखाने, सहकारी बँका, शाळा व महाविद्यालय हे मराठा समाजाकडेच आहे. इ. एक ना अनेक कारणांमुळे आज मराठा समाजाला ओबीसी मध्ये घेण्यास तीव्र विरोध होत असल्याचा जनसामान्याच्या भावनांनमधून दिसून येतो. त्यामुळे आता या अस्थिर महाराष्ट्राला पुन्हा एकदा स्थिरता प्रधान करण्याचे काम शासनाचे आहे. ते कशा पद्धतीने करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


      बिहारच्या धर्तीवर जातनिहाय जनगणना करून "ज्यांची जेवढी लोकसंख्या तेवढा त्यांना अधिकार" अशी भूमिका शासन घेते की काय? किंवा आणखी दुसरी काही उपाययोजना शासन करणार हे समजून घ्यावे लागेल. महाराष्ट्राच्या  अस्थिरतेला फक्त आरक्षण ही एकच गोष्ट जबाबदार आहे असेही नाही. तर सत्ता लालसे पोटी पहाटेचा झालेला शपथविधी असेल, पक्ष फोडून सुरत, गुवाहाटी मार्गे गोवा जाणे, घटनाबाह्य शासन स्थापन करणे, परत दुसऱ्यांदा पक्ष फोडून दुपारचा शपथविधी करणे, विरोधी पक्षातील नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करून बदनामी करणे व विविध तपास यंत्रणा मागे लावून पक्षांतर घडवून आणणे. तसेच धार्मिक वातावरण सतत दूषित ठेवण्याचे काम राजकारणी लोक सातत्याने करत असतात. त्याला सर्वसामान्य जनता (युवक) बळी पडते. परिणामी निष्पाप लोकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. असे अनेक घटना आहेत की ज्यामुळे आज देशांमध्ये महाराष्ट्र राज्य एक 'अस्थिर राज्य' म्हणून आपली ओळख निर्माण करताना दिसून येत आहे. आपल्याला ही ओळख पुसून पुन्हा एकदा आपल्या संतांच्या व पुरोगामी विचाराचा अंगीकार करावा लागेल व सर्व दुष्ट प्रवृत्तीवर मात करत नैसर्गिक ऋणानुबंध, बंधुभाव जपणारा महाराष्ट्र निर्माण करावा लागेल. यासाठी युवक अधिक प्रमाणात जागृत असणे गरजेचे आहे.

अस्थिर महाराष्ट्र कोण करू पाहत आहे? युवकांनी व वाचकांनी चहू बाजूने विचार करावा. कोणत्याही दबावास अमिषास व अफवांवर विश्वास न ठेवता वास्तविक परिस्थिती स्वीकारावी. संविधानिक मार्गाचा अवलंब करावा...

बळीराम शेषेराव चव्हाण, पीएच.डी (संशोधक विद्यार्थी) धाराशिव (उस्मानाबाद), ९०२८४४६९४१/४२ .

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंजारा समाजाला ST आरक्षण मिळावे

सावित्री ज्योती व आजच्या स्त्रिया

कृषी क्रांतीचे जनक वसंतराव नाईक