शिक्षणाचा महामेरू: महात्मा फुले

    भारतीय समाजाच्या पाया हा चार वर्णावर आधारित आहे. अर्थातच वर्णव्यवस्थेचा पुरस्कारर्ता म्हणून भारत देशाला ओळखले जाते. या वर्णव्यवस्थेतून जातीय उतरंड निर्माण झाल्याचे देखील पाहायला मिळते. या जातीय उतरंडीमुळे वरतून खाली तिरस्कार व खालून वर द्वेष (ब्राह्मण ते अतिशूद्र व अतिशूद्र ते ब्राह्मण)  एकमेकांबद्दल टोकाचा होता. यामुळे भारतीय समाज हा पूर्णपणे विषमतामुलक बनलेला होता. या विषमतामुलक स्थितीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी व समाजामध्ये समता प्रस्थापित व्हावी, आधुनिक शिक्षण व्यवस्थेचा स्वीकार भारतीयांनी करावा, अंधश्रद्धेपासून भारतीयांची मुक्तता व्हावी, भटांच्या कटातून, अंधश्रद्धेतुन  भारतीयांना मुक्तता मिळावी, एक नवी दृष्टी मिळावी. या अस्थिर समाज व्यवस्थेला छेद देऊन या समाजात नव चैतन्य घडवून आणणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज 133 वा स्मृतिदिन जेव्हा आपण साजरा करतो तेव्हा त्यांचे आठवण म्हणून त्यांच्या विचाराची जागरण करत असतो. की ज्या विचारामुळे समाज जागृत होत आहे.


     आधुनिक काळात ज्याला आपण शिक्षण म्हणतो ते शिक्षण महात्मा फुले यांच्या पूर्व काळात अस्तित्वात नव्हते. तत्कालीन परिस्थितीत ब्राह्मण वर्गाची जिथे मोठी वस्ती असत; त्या ठिकाणी शास्त्री खाजगी शाळा उघडत. त्यात संस्कृत, व्याकरण, न्याय, ज्योतिष, वेदांत, शास्त्र, अलंकार व धर्मशास्त्र शिकवला जाई. याची दुसरी बाजू पाहिली असता याच देशातील ज्यांना हिंदू म्हणून संबोधले जाई त्या इतर एकाही समाजातील कनिष्ठ लोकांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. उच्चवर्णीयांना देखील कधीच वाटले नाही यांना शिक्षण द्यावे. त्याच परिस्थितीत काही खेड्यांमध्ये मुलांना प्राथमिक शिक्षण देणाऱ्या शाळा होत्या. तिथे पंतोजीकडुन व्यापाराच्या आणि श्रीमंताच्या मुलांना शिक्षण देण्यात येई. कारकुनी कुलकर्णी व सावकारी चालविता यावी एवढाच या शिक्षणाचा मर्यादित उद्देश असे. बालबोध लिपी ब्राह्मणांशिवाय क्वचित कोणी शिकत असे. इतर लोक मोडी लिपी लिहायला व वाचायला शिकत. अंकगणित हे रट्टा मारून घेण्यात येई. इतिहास, भूगोल सारखे विषय नावाला देखील नव्हते. तत्कालीन पुस्तके म्हणजे हस्तलिखित पोत्या; त्यातही देवदेवतांच्या कथा असत. त्यावेळी एक म्हण प्रचलित होती, "मागता येईना भीक तर पंतोजीपणा शिक". (प्रत्यक्ष भीक मागण्याऐवजी धार्मिक दृष्टीने कायदेशीर रित्या भीक मिळवणे) अशी परिस्थिती होती.

     भारतात इंग्रजांचे राज्य सुरू होण्यापूर्वी समाज घटकातील व्यक्तींना शिक्षण देणे हे सरकारी दायित्व नसे. फुलेपूर्व काळात महाराष्ट्रात राज्यसत्ता व धार्मिक सत्ता ब्राह्मणांच्या हाती असल्यामुळे केवळ ब्राह्मणांनाच धार्मिक ग्रंथ वाचण्याचा, पठण करण्याचा व शिक्षणाचा अधिकार होता. त्यानंतर १८१३ साली ब्रिटिशांनी 'शिक्षण' सर्वांसाठी खुले केले. शिक्षणाची प्रभात झाली असे म्हणायला काही हरकत नाही. १८२१ साली  चॅप्लिन नावाच्या इंग्रज आयुक्ताने स्थापन केलेल्या संस्कृत पाठशाळेत फक्त ब्राह्मणांनाच प्रवेश मिळे. इतर जातीच्या हिंदूंना तिथे प्रवेश नव्हता परंतु कालांतराने तिथे सर्वांना प्रवेश देण्यात येऊ लागले. मात्र ते ब्राह्मणांना कसे पचनी पडणार; त्याला त्यांनी विरोध केला. ब्राह्मण शिक्षकांनी तर ब्राह्मणेत्तर विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवण्यास नकार दिला. कारण धर्मशास्त्राप्रमाणे (मनुस्मृती)  ब्राह्मणेत्तरांना संस्कृत शिकण्याचा अधिकार नव्हता. बहुतेक ब्राह्मणांनी "ब्राह्मणेत्तर विद्यार्थ्यांना संस्कृत ही पवित्र भाषा शिकवण्यापेक्षा आम्ही राजीनामा देऊ" अशी तत्कालीन सरकारला धमकी दिली.

     कनिष्ठ वर्गाच्या उध्दाराविषयी उदासीनवृत्ती दिसून येत होती. तरी त्या वर्गातील काही मुलांनी त्याकाळी शिकण्याचा प्रयत्न केला. त्यांना ब्राह्मणांनी अत्यंत निर्दयपणे वागवून त्यांचा छळ केला. या छळाला महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर देखील अपवाद नाही. कनिष्ठ वर्ग हे विचार संपन्न नसल्यामुळे त्यांची मानसिक गुलामगिरी स्पष्टपणे दिसून येत होती. म्हणून महात्मा फुले यांनी असे म्हटले होते की,

          "विद्येविना मती गेली।         

           मतिविना नीती गेली।     

          नीतिविना गती गेली। 

          गतिविना वित्त गेले। 

          वित्ताविना शूद्र खचले। 

    इतके अनर्थ एका अविद्येने केले"।।

"अज्ञान म्हणजे अंधार व शिक्षण म्हणजे प्रकाश" असे महात्मा फुले यांना वाटू लागले. शिक्षण हे सर्व सुधारणांचे मूळ आहे. कनिष्ठ वर्गातील लोकांना ज्ञानाचे दरवाजे खुले करून त्यांच्यामध्ये शिक्षणाचा प्रसार केला तर समतेच्या कल्पनेने स्फुरलेले कनिष्ठ वर्गातील लोक सामाजिक समतेसाठी बंड करून उठतील. या उद्देशाने त्यांनी शिक्षण व समता यांचे निशाण १८४८ साली उभारले. हिंदूशास्त्राप्रमाणे हिंदू स्त्रीला कनिष्ठ दर्जा देण्यात आला होता. श्रुतीचा काळ सोडला तर शतकानुशतके तीच परिस्थिती चालू होती. त्याला छेद देत शूद्र व स्त्रियांना शिक्षण देण्याचे महात्मा फुले यांनी ठरवले.

      अहमदनगर येथील अमेरिकन मिशनच्या शाळेत या पद्धतीने मुलींना शिक्षण देण्यात येत होते ते पाहून महात्मा फुले खुश झाले. त्याच प्रेरणेतून आपल्या शिक्षण कार्यात आपली पत्नी सावित्रीबाईचे साह्य व्हावे म्हणून त्यांनी तिचे शिक्षण सुरू केले. तेव्हा केशवराव भवाळकर (जोशी) यांनी सावित्रीबाईंना शिक्षणाच्या बाबतीत मार्गदर्शन केले. स्वतः महात्मा फुले कनिष्ठ वर्गांच्या मुलींसाठी १८४८ च्या ऑगस्ट महिन्यात बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात मुलींची शाळा सुरू केली. या शाळेत ब्राह्मण व ब्राह्मणेत्तर मुलींना शिक्षण महात्मा फुले देत असे परंतु ब्राह्मणी व्यवस्थेच्या वर्चस्वाला घाबरून अस्पृश्य लोक मुलींना शाळेत पाठवत नसे. अस्पृश्यांना शिक्षणाची ओढ नव्हती; तेव्हा लहुजी वस्ताद आणि रानबा महार यांनी आपल्या लोकांची समजूत घालून मुलांना शाळेत पाठवण्यास प्रवृत्त केले. त्या शाळेत संस्कृत ऐवजी वाचन, अंकगणित आणि व्याकरण शिकवला जाई. या शाळा सुरळीत चालाव्यात म्हणून महात्मा फुले यांचे सहकारी सखाराम परांजपे, सदाशिव हाटे, मोरो वाळवेकर व सदाशिव गोवंडे हे आर्थिक सहाय्य करीत असे.

    पुणे हा सनातन्यांचा बालेकिल्ला असल्यामुळे महात्मा फुले यांना शिक्षण प्रसार व प्रचार करण्यास अनेक अडचणी सामोरे जावे लागले. शिवाय यात सनातन परिवारातील अनेक पुरोगामी विचारांचे त्यांचे मित्र त्यांच्या प्रत्येक अडीअडचणीला हजर राहत असे. याच सनातन्यांनी शुद्रांना विद्येचा अधिकार नसल्याने त्यांना शिक्षण शिकवणे म्हणजे देव, धर्म, समाज यांच्याविरुद्ध वर्तन करणे होय. आणि मुलींना शिकवणे म्हणजे हिंदू धर्मावर मोठा भयंकर अत्याचार होय अशी त्यांनी महात्मा फुले विरुद्ध तक्रार करण्यास प्रारंभ केले. शिवाय ज्या या शाळेत मुलींना पुरुष शिकवतो त्या शाळेत मुली पाठवणे हा सनातन्यांच्या दृष्टीने मोठा अपराध होता. म्हणूनच पुढे पहिली महिला शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंचा उदय झाला. सावित्रीबाई फुले या महात्मा फुले यांच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होऊन त्यांच्या कार्यामध्ये हिरीरीने सहभाग घेतला व तो तडीस नेला...


आज महात्मा ज्योतिबा फुले यांचा १३३ वा स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..💐💐


बळीराम शेषेराव चव्हाण, पीएच.डी (राज्यशास्त्र) ९०२८४४६९४१/४२..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंजारा समाजाला ST आरक्षण मिळावे

सावित्री ज्योती व आजच्या स्त्रिया

कृषी क्रांतीचे जनक वसंतराव नाईक