पाच डिसेंबर बंजारा गौरव दिन.

पाच डिसेंबर बंजारा गौरव दिन...
       स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्र घडवण्यात ज्या काही थोर विभूतींचे योगदान आहे; त्या विभुतीमध्ये वसंतराव नाईक यांच्या नावाचा प्रधान्याने उल्लेख केला जातो. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, सुधाकरराव नाईक यांसारख्या प्रख्यात मुख्यमंत्र्यांसोबत वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने सुजलाम-सुफलाम केले. आज महाराष्ट्र जो काही घडला आहे यामध्ये वसंतराव नाईक यांचा सिंहाचा वाटा आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ११ वर्ष विराजमान राहिलेल्या वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढीसाठी उल्लेखनीय काम केले. आपल्या १९५२ ते १९६९ या २७ वर्षाच्या कार्यकाळात शेतीविषयक अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवल्या. "दोन वर्षात महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण झाला नाही; तर मी फाशी घेईल" हे धाडसी उद्गार त्यांनी १९७१ मध्ये पूर्णत्वास आणले. त्यांच्या शेतीविषयक कार्याचे कौतुक तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केला. त्यांनी रोजगार हमी योजना देशभरात राबवली. 'तांड्याचा नायक ते महाराष्ट्राचा नायक' असे बिरुद लागलेल्या आणि शेतकऱ्यांसाठी अविरत झटणाऱ्या या कार्यधुरंदर नेत्याचा १९६९ मध्ये वयाच्या ६६ व्या वर्षी आकस्मित मृत्यू झाला.
       

      हिमालयाच्या उंची एवढ्या उभ्या केलेल्या कार्याचे स्मरण जर आपल्याला करायचे असेल तर तो स्मरण दिन किंवा तोच दिवस आज बंजारा समाज "गौरव दिन" म्हणून साजरा करतो. तो दिवस आहे ५ डिसेंबर, आजच्या दिवशी वसंतराव नाईक यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. या दिनाला आपण
"गौरव दिन" म्हणून २०१७ नंतर संपूर्ण महाराष्ट्रभर किंबहुना भारतभर साजरा केला जातोय...
     वसंतराव नाईक बंजारा समाजातील पहिले वकील तसेच पुसद नगरपालिकेचे अध्यक्ष, तत्कालीन मध्यप्रदेश चे महसूल राज्यमंत्री, महाराष्ट्राचे सहकार मंत्री, कृषी मंत्री, महसूल मंत्री याशिवाय सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईक यांनी काम पाहिले. खऱ्या अर्थाने वसंतराव नाईक यांच्या नंतर एकही असा मुख्यमंत्री झाला नाही, ज्याने आपल्या सत्ता काळात सलग पाच वर्षे मुख्यमंत्री पदावर विराजमान राहीले. यास अपवाद फक्त २०१४ सालचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहे. मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईक यांनी सर्वात प्रथम म्हणजेच पहिल्यांदा ५ डिसेंबर १९६३ रोजी शपथ घेतली होती. 
         वसंतराव नाईक यांचा समाजातील रूढी-परंपरा आणि अंधश्रद्धेवर विश्वास नव्हता. भटक्या-विमुक्त समाजातील मुलांना व इतरांनाही चांगलं शिक्षण घेता यावे या उद्देशाने त्यांनी महाराष्ट्रात एकूण ७०० आश्रम शाळा सुरू केल्या. १९५७ ते १९६० दरम्यान कृषिमंत्री असताना च्या काळात त्यांनी कृषिविषयक अभ्यासासाठी चीन, जपान, सिंगापूर आणि श्रीलंका आदी देशात दौरे करून वेगवेगळ्या शेती पिकांच्या संकरित वाणांचा अभ्यास केला. तेथील शेती वाणांची महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ओळख करून दिली व स्वतः प्रत्यक्षात प्रयोग देखील केलेले आपणास दिसून येते.
          १९७२ च्या दुष्काळात त्यांनी अभूतपूर्व काम केले. लागोपाठ तीन वर्ष अवर्षणाचे असल्याने नागरिकांच्या आणि जनावरांच्या अन्न पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. अशा वेळी त्यांनी देशात पहिल्यांदाच 'रोजगार हमी योजना' महाराष्ट्रात राबविण्याचे धाडस केले. त्याशिवाय इतर अश्या काही योजणा राबविण्यात आल्या ज्यामुळे महाराष्ट्र प्रगतीपथावर गेला. त्याकाळी जवळपास ४० लाखांवर नागरिकांना रोजगार मिळाला होता. त्याचबरोबर महाराष्ट्रासाठी केंद्राकडे एकच कृषी विद्यापीठाची तरतूद असताना त्यांनी एकूण चार कृषी विद्यापीठे महाराष्ट्राला देऊन महाराष्ट्रातील प्रादेशिक असमतोल दूर केला व कृषी विकासाला चालना दिली. भारताचे माजी कृषिमंत्री शरद पवार एका ठिकाणी सांगतात की, "दुष्काळ किंवा आपत्तीशी सामना कसा करावा हे मला वसंतराव नाईक यांच्याकडून शिकायला मिळाले". असे हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांनी सर्वप्रथम 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तो दिवस आज आपण सार्थ अभिमानाने "गौरव दिन" म्हणून साजरा करतो. या गौरव दिनाच्या तमाम बंजारा समाज, वसंतराव नाईक प्रेमी व संपूर्ण महाराष्ट्र वासियांना गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..💐💐    

                                                                        बळीराम शेषेराव चव्हाण, पीएच.डी (राज्यशास्त्र) धाराशिव (उस्मानाबाद)...                  
९०२८४४६९४१/४२

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंजारा समाजाला ST आरक्षण मिळावे

सावित्री ज्योती व आजच्या स्त्रिया

कृषी क्रांतीचे जनक वसंतराव नाईक