वास्तविक जीवनाचा मार्गदाता संत सेवालाल..
वास्तविक जीवनाचा मार्गदाता संत सेवालाल..
महाराष्ट्राच्या माती मध्ये अनेक संत परंपरा उदयाला आल्या. महाराष्ट्राच्या मातीला जसा पराक्रमाचा वारसा आहे तसा संतांच्या विचारांचा सुगंध आहे.महान महाराष्ट्राच्या भूमीत अनेक जाती धर्मात साधु-संत, प्रबोधनकार, कीर्तनकार, समाज सुधारकांनी जन्म घेतला. त्या सर्वांचे विचार हे कोणत्याही जातीपुरते मर्यादित नसतात. तर त्यांचे मार्गदर्शन, विचार, प्रबोधन, भजन-कीर्तन, दोहे, कवणे हे जनतेच्या जडण-घडणीसाठी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरतात. मुळात महाराष्ट्राची जडण-घडण संताच्या विचारातून झालेली आहे. समाजातील वाईट चालीरीती, अज्ञान, अंधश्रद्धा, जातीव्यवस्था नष्ट करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य याच संत मंडळीच्या विचारातून पुढे येते. अशाच अनेक विज्ञानवादी विचारांचा वसा घेऊन जन्मभर समाजसुधारणेसाठी झगडणारे भटक्या विमुक्त जातीतील बंजारा समाजात संत सेवालाल महाराज यांचा जन्म तत्कालिन आंध्रप्रदेश व सध्याच्या तेलंगणा राज्यातील अनंतपूर जिल्ह्यात असणाऱ्या गुत्ती तालुक्यातील गोलार डोडी या तांड्यात 15 फेब्रुवारी 1739 रोजी झाला. सध्याच्या परिस्थितीत त्या गावाला 'सेवागड' या नावाने ओळखले जाते. त्यांच्या वडिलांचे नाव भीमा नाईक आणि आईचे नाव धर्मणी याडी असे होते.
संत सेवालाल महाराजांचे एक संत म्हणून विचार करताना त्यांचे विचार भारतीय संत परंपरेतील भगवान महावीर, संत कबीर, संत बसवेश्वर, संत तुकाराम, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज यांच्या तोडीचे आहेत; परंतु त्यांचे विचार अलिखित असल्या कारणाने अनेक वर्ष त्यांचे विचार समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यास विलंब झाला.
भटकंती करणे ही बंजारा समाजाची एक परंपरा होती. ती भटकंतीही मालवाहतूक व्यापाराच्या संदर्भातील भटकंती होती. या निमित्ताने जेव्हा संत सेवालाल महाराज संपूर्ण भारतभर भ्रमंती करतात तेव्हा त्यांना अनेक संतांविषयी माहिती मिळाली. त्याच्या विचारातून प्रेरित होऊन त्यांना सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. या सत्याच्या शोधातून आपल्या समाजाला जीवन जगण्याचा खरा मार्ग दाखविला. संत सेवालाल महाराज यांचे विचार मानवतावादी, विज्ञानवादी व बुद्धिवादी शिकवण देणारे आहेत. समाजातील भोळ्या समजुती, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता अनितीचेे व्यवहार, भूतदया, निसर्गप्रेम, सत्य, अहिंसा इत्यादी अनेक बाबतीत त्यांनी आपले विचार प्रकट केले आहेत. ते विचार वचने, दोहे, कवने या स्वरूपात पहायला मिळते. तसेच त्यांनी जंगल आणि पर्यावरणाचे रक्षण करा, स्त्रियांचा सन्मान करा, भेदभाव करू नका, खोटे बोलू नका, धैर्यवान व आत्मविश्वासू जीवन जगा, व्यसन करू नका, भुकेल्यांना अन्न द्या, सर्वांचे आदर करा, अंधश्रद्धा टाळा यासारखी 22 प्रमुख तत्वे संत सेवालाल महाराज यांनी समाजाला दिशादर्शक दिलेली दिसून येतात.
सेवालाल महाराज हे अनेक तांड्यांना सोबत घेऊन 'लदेणी' करत. भारत देशा सोबतच परदेशातही व्यापार करत असत. बैलांच्या पाठीवर सामान भरून व्यापार करण्याच्या पद्धतीला 'लदेणी' म्हणतात. बंजारा माल भरायला जात हेच ते दिल्लीतील चांदणी चौक. चांदणी चौकात सर्व गोर बंजारे जमत असत. पहाटेच्या वेळी ते इतरत्र तेथून व्यापारासाठी बैलावर माल घेऊन वेगवेगळ्या दिशेने जात. चांदणी निघण्याची वेळ होती यावरून या चौकाला चांदणी चौक असे नाव पडले. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात सेवा नावाचे गाव आज सुद्धा आहे. येथे सेवालाल महाराज यांचे सेवा पोर्ट व बंदरगहा होते. येथूनच सेवालाल महाराज परदेशात व्यापार करत असत. आता येथे जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट आहे. सेवालाल महाराजाच्या एका सहकार्याचे नाव धर्मा होते. त्यावरून रायगड जिल्ह्यातील धरमतर खाडी म्हणून सध्या ओळखली जाते. आज मुंबईमध्ये जो 'भाऊचा धक्का' आहे तो पूर्वी 'सेवाभायाचा धक्का' म्हणून ओळखला जात असे. या ठिकाणी पोर्तुगीजांचे जहाज समुद्रात अडकले होते. सेवाभाया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ते जहाज धक्का देऊन समुद्रा बाहेर काढले. रायगड जिल्ह्यात गागोंदे हे गाव आहे. तेथे सेवालाल महाराज यांचे मोठे व्यापारी केंद्र होते.
सेवालाल महाराज थोर क्रांतिकारक होते. सतराव्या शतकात राजकीय 17 व्या शतकात इंग्रजांची ताकद वाढत होती. इंग्रजी हुकुमतीचा राजांना रसद पुरवण्याचा विरोधात बंजारा वर दबाव वाढत होता. बंजारा कडून कर वसुलीचे फर्मान सोडण्यात आले. सेवालाल महाराज यांनी या संदर्भाने निजामाला भेटायला गेले; परंतु इंग्रज हिमतीच्या भीतीने निजामाने प्रस्ताव नाकारला. सेवालाल महाराज यांनी निजामाच्या विरोधात युद्ध पुकारले. सेवालाल महाराज व निजाम यांच्या मध्ये बंजारा हिल्स हैदराबाद येथे युद्ध झाले. सेवालाल महाराजांनी निजामाचा पराभव केला. निजाम आणि सेवालाल महाराजांच्या सर्व शर्ती मंजूर केल्या. निजामाने कर प्रणाली च्या संदर्भात सेवालाल महाराज यांना दिल्लीच्या तत्कालीन बादशहा गुलाम खानला भेटण्याचा सल्ला दिला. सेवालाल महाराज यांनी स्वीकारला. निजामाने सेवालाल महाराजांना ताम्रपत्र, तलवार आणि काही वस्तू भेट दिल्या. गुलाम खान यांनी त्यांच्या करप्रणालीचा प्रस्ताव नामंजूर केला. परिणामी दोघांमध्ये युद्ध झाले. गुलाम खानच्या 25000 सैन्यांना सेवालाल महाराजांच्या 900 योद्ध्यांनी सळो की पळो करून सोडले. गुलामखान ची मोठी हार झाली व सेवालाल महाराजांनी दिल्लीचे राज्य जिंकले ही सेवालाल महाराजांची मोठी राजनीतिक जीत होती.
थोर तत्वज्ञ म्हणून देखील सेवालाल महाराज यांची ओळख आहे त्यांनी बंजारा भाषेत अनेक दोहे सांगितलेले आहेत. "जींळजो, छाळजो अन पचज माणजो", अर्थात कोणताही विचार व कृती करण्या अगोदर ती जाणून घ्या, आपल्या कसोटीवर तपासून घ्या आणि नंतरच त्याचा स्वीकार करा. "भजे, पुजेम वेळमत घालो, करणी करेरो सिको", अर्थात भजन, पुजन करण्यामध्ये वेळ घालू नका. तुम्ही तुमचे कार्य करायचे शिका. "सत्यधम लीनता ती रेणु, सदा सासी बोलंणू, हर वातेन सोच समचन केवंणू, भवसागर पार कर लेणू", अर्थात सत्य जाणून जीवन जगला तरच जीवनरूपी भावसागर पार करून जाल. सत्य हाच खरा धर्म आहे. इत्यादी अनेक अत्यंत प्रभावी आणि संवेदनशील असे उपदेश तत्वज्ञान सांगून समाजाला सन्मार्गावर चालण्याची शिकवण संत सेवालाल महाराजांनी समाजाला दिली. अशा संताचा महानिर्वाण महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील पोहरा या गावात झाला. आज त्यांची जयंती, या जयंती दिनाच्या सर्व बंजारा समाजातील अनुयायांना व वैचारिक वारसदारांना जयंतीच्या खुप खुप शुभेच्छा..
बळीराम शेषेराव चव्हाण.
संशोधक विद्यार्थी..
9028446942


छान माहिती..शुभेच्छा बळीराम
उत्तर द्याहटवाधन्यवाद..
हटवाखूप छान👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद..
हटवाछान माहिती आणि नवीन माहिती मिळाली असेच वाचन लेखन चालू ठेवा
उत्तर द्याहटवा