समनक जनता पार्टी राजकीय प्रस्थापितशाही नष्ट करेल!

लोकसभा बुलेटिन क्रमांक-१२


समनक जनता पार्टी राजकीय प्रस्थापितशाही नष्ट करेल!

महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणार?.

✍️याडीकार पंजाबराव चव्हाण, पुसद- 9421774372


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

      9 एप्रिल 2023 रोजी माहूरगड येथे समनक जनता पार्टी लॉन्च करण्यात आली होती .लोकसभा निवडणुकीमध्ये यवतमाळ, वाशिम, हिंगोली आणि परभणी येथे समनक जनता पार्टीने उमेदवार उभे केलेले असून समनक जनता पार्टीचे *स्टार प्रचारक प्रा. संदेश चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष गोरसेना* यांनी प्रचारामध्ये प्रचंड आघाडी घेतलेली असल्याने राजकीय पक्षाचे धाबे दणाणले आहे. त्याबद्दल मी मनःपूर्वक स्वागत करतो!आणि त्यांच्या सर्व उमेदवारांचे सुयश चिंतींतो !💐💐

      लोकसभेच्या निवडणुका आधी प्रा. संपत चव्हाण यांनी समनक जनता पार्टी लॉन्च करणे हे जरी काही लोकांना आणि पक्षाला खटकत असले, तरीही गोरबंजारा हितासाठी मला फार महत्त्वाचे वाटत आहे. आज महाराष्ट्राच्या राजकारणाचा जर विचार केला तर गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्रातिल राजकारण फार ढवळून निघत आहे. कोणत्याही पक्षाकडे आज जनमत नाही. एकमेकांच्या उकाळ्या पाकाळ्या काढून कसं तरी हे सरकार दिवस ढकलत आहे. ईडी, आणि सिडीला घाबरून अनेक नेते भाजपावाशी झाले आहे. *भ्रष्टाचाराचा एकच नारा जेल पेक्षा भाजपा बरा* अशीच अवस्था काही नेत्याची झाली आहे. सध्या भारतात 15 कोटी तर महाराष्ट्रात 2.5 कोटी गोर बंजारा समाज असून महाराष्ट्रात 75 लाख मतदार असलेल्या गोरबंजारा समाजाकडे स्वतःच्या हक्काची पार्टी असणे मला फार महत्त्वाचे वाटते. आणि ती काळाची गरज आहे . कारण येणाऱ्या काळात गोरबंजारा समाजाला कोणताही पक्ष उमेदवारी देण्यासाठी मागे पुढे पाहिल? कारण आपल्या राजकीय नेत्याची धरसोड वुत्ती याला कारणीभूत आहे. केवळ एका जातीच्या भरोशावर राजकारण करणे जरी शक्य नसले. तरी पार्टीच्या भरोशावर युती करून राजकारण करता येईल ही तितकीच गोष्ट खरी आहे.



गोरसिकवाडी , गोरसेना आणि समनक जनता पार्टी!

      महाराष्ट्रामध्ये मातृ संघटना म्हणून ऑल इंडिया बंजारा सेवा संघ हे फार मोठे संघटन होते. पण मागील काही वर्षात ते संघटन कोमात गेल्यामुळे अनेक गोर संघटना जन्माला आलेल्या आहेत. बंजारा क्रांती दलाच्या माध्यमातून हरिभाऊ राठोड यांनी गोरबंजारा समाजाला चळवळ शिकवली. परंतु त्यांच्याही संघटनेचे दोन तुकडे झाले. अशा बिकट परिस्थितीमध्ये दिगंबरभाऊ राठोड यांनी महाराष्ट्र बंजारा कर्मचारी सेवा संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्राला मजबूत संघटन देण्याचा प्रयत्न केला. आणि ही संघटना जोमात सुरू असताना याच संघटनेत माझ्या सोबत काम करणारे माझे मित्र *प्रा. पंडित चव्हाण, एम. आर. राठोड आणि काशिनाथ राठोड* यांनी गोरसिकवाडीची वेगळी चूल मांडली. काही दिवसानंतर प्रा. पंडित चव्हाण आणि एम. आर .राठोड हे या संघटनेतून बाहेर पडले. आणि एम.आर.राठोडचा (मारोती रामचंदीया भुकीया) झाला. हातात पाना आणि नटबोल्ट घेऊन एसटीचे पार्ट कसणारे *काशिनाथ राठोड* यांनी एकट्या *प्रा. संदेश चव्हाणला सोबत* घेऊन गोरबंजारा समाजाचे ढिले झालेले नट बोल्ट कसण्यासाठी बाहेर पडले. *प्रा.संदेश चव्हाण आंघ ..आंघ आणि लार लार काशिनाथ राठोड यांनी अनेक तांडयाची उपाशीपोटी पायपीट केली. प्रा. संदेश चव्हाण हा नवतरुण नोकरी लागलेला. त्यांनी काशिनाथ राठोडच्या क्रांतिकारी विचाराला मान देऊन नोकरी एका झटक्यात सोडली. आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून तो आजन्म अविवाहीत राहण्यासाठी आपल्या जीवनाची राख रांगोळी करून तो काशिनाथ राठोड सोबत बाहेर पडला.आणि ऐन तारुण्यात आपले जिवन दावावर लावले.* सुरुवातीला या दोघांनीच तांड्या तांड्यात, कॉलेज, शहरात जाऊन गोरसिकवाडी वाढवण्याचा भरपूर प्रयत्न केला.अहोरात्र मेहनत घेतली. त्यानंतर *अरुण चव्हाण, विलास रामावत, विजय पालत्या,रवी खोला आणि इतर पाच* सारखे आपल्या जिवनाची राखरांगोळी करणारे अजून काही गोरसैनिक यांच्यासोबत जोडल्या गेले. ही संख्या *दहा* पर्यंत वाढली. सर्वांचे नावे मला माहित नाही.(माफ करा) पण या दहा लोकांचे त्याग, समर्पण आणि गोरबंजारा समाजाविषयी असलेली निष्ठा ,तळमळ यामुळे गोरसिकवाडी हे संघटन कन्याकुमारी ते काश्मीर आणि त्याच्याही पलीकडे विदेशापर्यंत (अमेरिका,कँनडा ) पोहोचले. गोरबंजारा समाजातील एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला जे जमले नाही. ते काशिनाथ राठोड सारख्या एका मेकॅनिकला जमले. आणि *काशिनाथ राठोड हे एका झटक्यात काशिनाथ नायक झाले.* गोरसिकवाडीच्या यशानंतर गोरबंजारा समाजामध्ये होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात काशिनाथ नायक यांनी प्रा. संदेश चव्हाणच्या नेतृत्वामध्ये गोरसेना उभी केली. *आज ती गोरसेना फक्त गोरसेना राहिलेली नसून ती एक लोक चळवळ झालेली आहे*. परंतु अरूण चव्हाण आणि विलास रामावत आणि इतर काही मंडळी मात्र बाहेर पडली. ते आज एकत्र असायला पाहिजे. हि काळाची गरज आहे. बघा प्रा.संपत चव्हाण जमत असेल तर एकत्र या....! ताकद तुम्हचीच वाढणार आहे. या सर्व आघाडीवर काम करत असताना काशिनाथ नायक नेहमी सांगायचे की, मला समाजकारण करायचे आहे. *राजकारण अजिबात करणार नाही.* ही तितकीच गोष्ट त्यावेळी त्यांच्या गोर सैनिकांना आवडत होती. तरीही आम्ही त्यांना नेहमी म्हणायचो की, काशिनाथ भाऊ तुम्हाला राजकारण केल्याशिवाय पर्याय नाही. कारण राजकारणात गेल्याशिवाय तुम्ही गोरबंजारा समाजाला न्याय,हक्क आणि अधिकार देऊ शकत नाही. महानायक वसंतराव नाईकसाहेब मुख्यमंत्री होते. म्हणून गोरबंजारा समाजाची प्रगती झाली. 

सत्ता वो ऐसी चाबी है। वो हर समस्या का ताला खोल देती है।

 त्यांना त्यांच्या शेवटच्या काळामध्ये पटले. आणि त्यांनी सन 2019 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पाच उमेदवार उभे केले. आणि निवडणूक रणनिती जाणुन घेतली. *महाराष्ट्रातून त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. पण मी तेंव्हाही त्यांच्या सोबत होतो. त्यांच्यावर लेख लिहून शुभेच्छाचा वर्षाव केला. काशिनाथ नायक यांचे राजकारणनितीचे मी जोरदार समर्थन केले.* आणि आजही समर्थन करत आहे. म्हणून त्यावेळेस त्यांनी आपला दौरा स्थगित करून ते मला भेटण्यासाठी स्पेशल त्यांनी पुसद येथील सुंदल निवास गाठले होते. ती ऐतिहासिक भेट होती. आज ते जिंवत असते तर त्यांनी मला आवर्जुन बोलावले असते असो.


 समनक जनता पार्टी राजकीय प्रस्थापितशाही नष्ट करेल!

     आज महाराष्ट्राच्या राजकारणाची कारण मीमांसा केली. तर काँग्रेसच्या पाठीमागे भक्कमपणे उभे असलेल्या गोरबंजारा समाजाचा आज 35 ते 40 मतदारसंघात प्रभावित मतदान असताना आणि 16 ते 17 मतदार संघात निवडून येण्याची ताकद ठेवणारा असतांना सुद्धा काँग्रेसने पाहिजे त्या प्रमाणामध्ये गोरबंजारा समाजाला प्रतिनिधीत्व दिलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि शिवसेना या पक्षांनी सुद्धा गोरबंजारा समाजाच्या समस्या निकाली न काढता तोंडाला पाने पुसली. अशा या राजकारणातील सर्वच प्रस्थापित पक्षाविरुद्ध गोरबंजारा समाजातूनच एखादा पक्ष निर्माण व्हावा. अशी सुप्त इच्छा अनेक जाणकार आणि गोरविचारवंतांच्या मनात घर करून होती. आणि झाले तसेच. समनक जनता पार्टीच्या माध्यमातून गोरबंजारा समाजाच्या न्याय, हक्काकरिता समनक जनता पार्टीची जी निर्मिती झालेली आहे. ही गोष्ट आज जरी काही लोकांना खटकत असेल. परंतु येणाऱ्या भविष्य काळामध्ये गोरबंजारा समाजासाठी फार मोठी उपलब्धी आहे. समनक जनता पार्टी लॉन्च होत असल्याचे सोशल मीडियावर बघून महाराष्ट्राच्या राजकीय राजकारणात जोरदार चर्चा असून एक दिवस समनक जनता पार्टी राजकारणातील प्रस्थापितशाही नक्कीच नष्ट करेल. अशीच चर्चा सर्वत्र होत आहे. कारण आज महाराष्ट्रामध्ये 27000 हजार ग्रामपंचायतीला जवळपास 9000 हजार तांडे जोडलेली असून प्रत्येक तांड्यामध्ये गोरशिकवाडी आणि गोरसेनेचे 100 ते 150 गोर सैनिक कार्यरत आहेत. हे 100 ते 150 गोर सैनिक यांनी आपल्या तांड्यातील मतदानाची टक्केवारी समनक जनता पार्टीच्या झोळीत जर टाकली. तर महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रस्थापितशाही ते जरूर नष्ट करू शकतात.! आणि राजकारणाची दिशा बदलवु शकतात.

     आज गोरबंजारा समाजामध्ये अनेक संघटना आणि राजकीय पुढारी असल्यानंतरही एकी नसल्यामुळे गोरबंजारा समाजाला राजकीय वाटा योग्य पद्धतीने मिळालेला नाही. *महानायक वसंतराव नाईकसाहेब आणि जलनायक सुधाकरराव नाईकसाहेब* यांच्या तोडीचे नेते आज गोरबंजारा समाजात नसल्यामुळे गोरबंजारा समाजाचे राजकीय आलेख दिवसेंदिवस कमी होत आहे. *वंचित आघाडी सारखा लहानशा पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलवतो. अगदी त्याच धर्तीवर समनक जनता पार्टी महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलवेल. आणि प्रस्थापितशाही नष्ट करेल! अशी लोकांची धारणा आहे*. मलाही विश्वास वाटते की, आज गोरसिकवाडी, गोरसेनेचे प्रत्येक तांड्यात जवळपास शंभर, सव्वाशे गोरसैनिक असून हे *नवतरुण नवविचाराचे, नवक्रांतीचे ढोल वाजवत आहे. आणि वाजवायला पाहिजे?* त्याची आज गरज आहे. हे नवतरुण ना काँग्रेसला, ना भाजपाला, ना राष्ट्रवादीला, ना शिवसेनेला पक्षाला मानतात. ते केवळ आणि केवळ काशिनाथ नायक यांना मानतात.ही निर्णायक मते एक गठ्ठा झाली.(आणि होतील.) तर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशाच बदलून जाईल. हे मात्र ज्योतिषाला सांगण्याची गरज नाही. त्याला कारणही तसेच आहे बंजारा समाजामध्ये आज अनेक प्रश्न आ वासून उभे असताना मात्र गोरबंजारा समाजातील संघटना, राजकीय नेते, पुढारी ,आमदार ,खासदार हे आपापल्या पक्षाचे ध्येय धोरणाच्या चौकटीत असल्यामुळे ते समाजाचे प्रश्न मांडू शकत नाही. आणि पक्ष सुद्धा त्यांना मांडू देत नाही. ही अंत्यत खेदाची गोष्ट आहे. गोरबंजारा समाजाला संपविण्याची नीती सर्वच राजकीय पक्ष वापरत असल्यामुळे समनक जनता पार्टीची निर्मिती होणे ही काळाची गरज असल्याचे आज लोकांना दिसत आहे. 



समनक जनता पार्टीचे दावे आणि आव्हाने!

       महाराष्ट्र हे देशातील अशा काही राज्यापैकी आहे. जिथे एकेकाळी काँग्रेस बळकट होती. काँग्रेसला लोकांचा भरघोस पाठिंबा होता. कारण महानायक वसंतराव नाईकसाहेब यांनी आपल्या मुख्यमंत्रीच्या काळामध्ये काँग्रेस पक्ष घराघरांमध्ये नेऊन पोहोचवला. परंतु पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी महानायक वसंतराव नाईकसाहेबाला आणि जलनायक सुधाकरराव नाईकसाहेबांना पंतप्रधान पि.व्ही.नरसिंहरावांनी तडकाफडकी राजीनामा देण्यास भाग पाडल्यामुळे काँग्रेसकडे असलेला गोरबंजारा समाजाचा कल हळूहळू राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि शिवसेनेकडे गेला. एका पक्षाला मतदान करणारा तांडा आज विविध पक्षांमध्ये पर्याय नसल्यामुळे विभागला आहे. ही मताची विभागणी रोखण्यासाठी प्रा. संपत चव्हाण यांनी अभ्यासपूर्ण समनक जनता पार्टीची निर्मिती केली असल्याचे आज तरी दिसून येत आहे. त्यांचेच गोरसैनिक आज समनक जनता पार्टी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत सत्ता काबीज करेल असे जरी दावे ते करत असतील तरी ते मात्र फोल आहे. अजून त्यांना वेळ आहे. घाई करून चालणार नाही. कारण संघा एवढे मजबूत संघटन नसून संघाला सुद्धा सत्तेत येण्यासाठी 75 वर्षे लागली होती. हे विसरून चालता येणार नाही. काही खोगीर भरती उतावीळपणा करताना दिसत असून समनक जनता पार्टी येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बाजी मारेल असे ते अहंकाराने सांगत आहे. हे मात्र अत्यंत चुकीचे प्रदर्शन होत असून यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष संपत चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला देणे फार गरजेचे आहे. असे मला वाटते. कारण राजकारण पाहिजे तेवढे सोपे नाही. राजकारण हे अहंकार अभिमानाने खेळले जात नसून ते संयमाने खेळल्या जाते. रामदास आठवले यांचा पक्ष लहान जरी असला तरीही त्यांच्या राजकीय नीतीमुळे ते नेहमी सत्तेत राहतात. कारण एकट्या समाजाच्या भरोशावर कोणत्याही पक्षाला राजकारण करता येत नाही. समाजकारण आणि राजकारणाची गल्लत जर झाली. तर त्याचे परिणाम आपण 2019 ला झालेल्या निवडणुकीत लोकसभा मतदारसंघ हिंगोली आणि यवतमाळ- वाशिम मतदारसंघात मध्ये बघितलेले आहे. समनक जनता पार्टी ही होऊ घातलेल्या लोकसभेमध्ये चांगले प्रदर्शन करेल. आणि राजकीय गणित मात्र जरूर बघडवेल. या मध्ये शंका नाही.जर गोर बंजारा समाजातील लोकांनी एकी केली आणि वंचित बहुजन आघाडीने पाठींबा दिला तर ते विजयाच्या दिशेने घोडदौड करू शकतात. जर त्यांनी एखाद्या चांगल्या पक्षाशी युती केली. तर निश्चितच पणे त्यांच्या सीटा निवडून येऊ शकतात. परंतु त्यांनी चांगल्या पक्षाशी युती करायला पाहिजे.

 आज त्यांच्या समोरही फार मोठी आव्हाने आहेत. एवढेच नव्हे तर गोरबंजारा समाजातील राजकीय नेते मंडळींमध्ये अगोदरच एक वाक्यता नाही. आणि आता समनक जनता पार्टी पुढे येत असल्यामुळे अजूनच गोरबंजारा राजकीय समीकरणांमध्ये गडबड झाल्याशिवाय राहणार नाही. असेही अनेक गोरविचारवंताची मते आहेत. सुरुवातीला समनक जनता पार्टीमुळे गोरबंजारा समाजाच्या राजकीय अस्तित्वालाच धक्का बसेल अशीच चर्चा सर्वीकडे असून ते खरे ही असू शकते. त्यामुळे *समनक जनता पार्टीचे उमेदवार प्रा ‌अनिल राठोड* ऊभे असल्याचे बघून सर्वच पक्षांमध्ये राजकीय चर्चेला उधाण आले आहे.


 सकारात्मक राजकारण

      समनक जनता पार्टीने सकारात्मक राजकारण करायला पाहिजे. असेच काहीसे चित्र आज महाराष्ट्रात दिसून येत आहे. कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुसद, दिग्रस, भोकर, किनवट या गोरबंजारा समाजाचे उमेदवार निवडून येणारे हमखास मतदार संघ असून या मतदारसंघात समनक जनता पार्टीने सकारात्मक राजकारण करून जर या ठिकाणी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे केले नाही. तर निश्चितच समनक जनता पार्टीचे महत्त्व शत पटीने वाढेल. सरसकट समनक जनता पार्टीने महाराष्ट्राच्या राजकारणात 288 सीटा लढवण्याचा जर प्रयत्न केला . तर काही प्रमाणात गोरबंजारा समाजाची नाराजी होऊ शकते. यासाठी समनक जनता पार्टीने निवडक मतदार संघ वगळून इतर मतदार संघात आपले उमेदवार उभे करून संघ, भाजपाच्या राजकीय रणनीतीला फाटा देऊन जर त्यांनी निवडणूक लढवली.तर ते महाराष्ट्राच्या राजकारणात नक्कीच यशस्वी होईल असे माझे प्रामाणिक मत आहे.दुसरे असे की या पार्टीत काही मँनेज होणारी मंडळी जर असेल (सध्या तरी दिसत नाही) तर त्यांच्यावर करडी नजर असायला पाहिजे. कारण अशा लोकांमुळे पक्ष बदनाम होतो.त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे?


 समनक जनता पार्टी राष्ट्रीय पार्टी कशी होईल!

       कोणत्याही पार्टीला राष्ट्रीय पार्टीचा दर्जा द्यायचा असेल तर त्याला निवडणुकीमध्ये 2% टक्के मतदान घेणे बंधनकारक असल्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश असल्याचे ऐकीवात आहे.. यानुसार जर समनक जनता पार्टीला राष्ट्रीय पार्टीचा दर्जा आणि स्वतःचे निवडणूक चिन्ह घ्यावयाचे असेल तर त्यांनी काही चांगल्या पक्षाशी युती करावी लागेल. केवळ युती करूनच चालणार नाही. तर ज्या मतदारसंघात ज्या समाजचे जास्त मतदान आहे. जसे मराठा, कुणबी, मुस्लिम, बौद्ध,आदिवासी समाजाची जास्त लोकसंख्या आहे. अशा जातीच्या उमेदवारांना समनक जनता पार्टीने उमेदवारी दिली. तर त्यांना मिळालेली मते निश्चितच जास्त राहील आणि ती दोन टक्के मतदान टक्केवारी पूर्ण करण्यास महत्त्वाची ठरेल. यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघात समनक जनता पार्टीने आपला गोरमाटी उमेदवार उभा केलेला असून प्रा. संदेश चव्हाणच्या नेतृत्वामध्ये प्रचारामध्ये प्रचंड आघाडी घेतलेली असून कोणत्याही राष्ट्रीय पक्षांनी गोरबंजारा समाजाच्या माणसाला उमेदवारी दिलेली नसल्यामुळे तांडा तांडयामध्ये राष्ट्रीय पक्षाच्या विरोधामध्ये प्रचंड राग आहे. या नाराजीचे मतदानात रूपांतर झाले तर प्रा. अनिल राठोड हे भरपूर मतदान घेऊ शकतात. सर्वच समाजाला समानवाटा द्यावा लागेल. अशा पद्धतीने समनक जनता पार्टीचे मतदानाची टक्केवारी वाढेल. आणि समनक जनता पार्टी एक दिवस राष्ट्रीय पार्टीचा दर्जा प्राप्त करून स्वतःचे निवडणूक चिन्ह सुद्धा मिळवेल. यामध्ये शंका नाही. यासाठी समनक जनता पार्टीने कोणत्याही परिस्थितीत संघ, भाजपा विचारधारेच्या पार्टीशी युती करू नये. असेच अनेक गोरविचारवंताचे म्हणणे आहे. होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जेव्हा लागतील त्यामध्ये धर्मांधतेचे राजकारण करणारे पक्ष फार दूर फेकल्या जाईल आणि सकारात्मक राजकारणाचा मार्ग येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना दिसून येईल. 2024 ची निवडणूक ही गोरबंजारा समाजाच्या अस्मितेसाठी फार मोठी लढाई असून यामध्ये गोरबंजारा समाज, गोरबंजारा समाजातील राजकीय पुढारी, नेते, गोरविचारवंत या सगळ्यांनी एकजूट दाखवली .तरच गोरबंजारा समाजाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येऊ शकतात. यासाठी समनक जनता पार्टीने पुढाकार घेणे फार महत्त्वाचे आहे. काशिनाथ नायक सारखा संयमी, मनमिळावू, सर्वांना घेऊन चालणारा नेता आज जरी गोरसिकवाडी मध्ये नसला तरी राहिलेल्या लोकांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून संयमी वृत्तीने ( हेकेखोर वृत्ती सोडा) सर्वांना सोबत घेऊन चालणे आणि सकारात्मक राजकारण जर केले. तर निश्चितच समनक जनता पार्टीला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोणीही रोखू शकत नाही. ही काळयादगडावरची रेघ आहे.


समनक जनता पार्टीची भुमिका आणि संभाव्य धोका! 

      समनक जनता पार्टीच्या भूमिकेविषयी आज जरी लोकांमध्ये संभ्रम आहे. तरी येणाऱ्या काळामध्ये ही पार्टी गोरबंजारा समाजाच्या न्याय, हक्कासाठी निश्चितच लढा देईल यामध्ये शंका नाही. परंतु या पार्टीला अनेक राजकीय मंडळी आणि संघ भाजपाकडून दबाव येऊ शकतो? यासाठी समनक जनता पार्टीने कोणत्याही आमिषाला बळी न पडता एकजुटीने, एक दिलाने ,हिम्मत ठेवून जर ही पार्टी गोरबंजारा समाजाच्या न्याय, हक्कासाठी लढली.तर निश्चितच या पार्टीला यश मिळेल. ही पार्टी जर संघ आणि भाजपाच्या विचारनितीकडे आकर्षित झाली. तर या पार्टीचे भविष्य अधांतरी राहील . यासाठी या पार्टीने प्रचार आणि प्रसिद्धीसाठी सोशल मिडीया, प्रिंट मिडीया, इलेक्ट्रॉनिक मिडियाचा आधार घ्यावा. जेणे करून सर्वच राजकीय पक्षांना समनक जनता पार्टीची ताकद कळेल. आणि ही पार्टी जोमाने वाढेल. यासाठी गोरसिकवाडी साहित्य दलाचे प्रसिद्ध कवी प्रा.रतन राठोड यांनी भरभरून लिहत राहावे .असे मनापासून वाटते.


प्रा.संदेश चव्हाण आगे बढो हम तुम्हारे साथ ह़ै। असाच नारा एक दिवस सर्वत्र घुमेल!

 जय सेवा... जय वसंत!


लेखन काळ-12 एप्रिल 2024

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंजारा समाजाला ST आरक्षण मिळावे

सावित्री ज्योती व आजच्या स्त्रिया

कृषी क्रांतीचे जनक वसंतराव नाईक