घटणारे मतांचे प्रमाण कोणास हानिकारक?

घटणारे मतांचे प्रमाण कोणास हानिकारक?

     भारतीय लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये कोणत्याही संघर्षाशिवाय व कोणतेही जात, धर्म, पंथ, लिंग किंवा सामाजिक समूह न पाहता सर्वांनाच मतदानाचा अधिकार भारत स्वतंत्र झाला तेव्हाच देण्यात आला. भारतीय राज्यघटनेने या देशातील सर्वसामान्यांपासून तर उच्चवर्गीयांपर्यंत (प्रस्थापित)  सर्वांना समान मतदानाचा अधिकार घटनेतील कलम 326 नुसार 'घटनात्मक अधिकार' म्हणून बहाल केला आहे. परंतु या विरुद्ध विचार केला तर ज्या देशाला आपण लोकशाहीची जननी म्हणतो, त्या ब्रिटनमध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार १९२८ मध्ये देण्यात आला. तसेच जगाची महासत्ता म्हणून ओळख असणाऱ्या अमेरिकेने  १९७६ ला All Men are Born Free and Equal हे सूत्र घेऊन राज्यघटना स्वीकारली गेली. परंतु स्त्रियांना मतदानाचा अधिकार १९२० मध्ये देण्यात आला. या प्रगत देशांचा विचार केला असता आपला भारत देश जो १५० वर्ष इंग्रजांच्या गुलामीत होता या गुलामीतून १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला, त्याच दिवशी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान मतदानाचा अधिकार बहाल केला.

  • Vote For Better India.
    लोकशाही शासन व्यवस्थेने आपल्याला जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे; त्या अधिकाराचा योग्य रित्या वापर करून आपण परिवर्तनशील भारत व सुशासन निर्माण करू शकतो. मतदान हे आपले केवळ हक्कच नव्हे तर त्याला आपण आपले कर्तव्य देखील समजले पाहिजे. त्यामुळे देशाच्या विकासामध्ये आपण फक्त हक्काचीच भाषा न वापरता कर्तव्य पालन देखील  शिकायला हवे. शिवाय देशाची दशा आणि दिशा समजून घेऊन सुशिक्षित नागरिकांनी जागरूक राहणे आणि मतदान करणे हेच समाज परिवर्तनाचे किंवा देशाची भावी दिशा ठरवण्यासाठीचे योग्य मार्ग आहे असे म्हणायला हरकत नसावी.

   आजच्या परिस्थितीत भारत देशामध्ये लोकशाहीच्या सर्वात मोठा सण साजरा होत आहे. हा सण म्हणजे दर ५ वर्षांनी येणारा सण म्हणून ओळखला जातो. या सणात प्रत्येक जाती-धर्माचे लोक आनंदाने सहभाग घेऊन हा सण उत्साहाने पार पाडत असतात. २०२४ साली १८ व्या लोकसभेचा आपण सण साजरा करतो आहे. ही लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यांमध्ये पूर्ण होत असून; १९ एप्रिल २०२४ रोजी पहिला टप्पा पूर्ण झाला. या टप्प्यात भारतीय निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार ५५.२९% मतदान महाराष्ट्रात तर ६५.५ टक्के देशात मतदान झाले आहे. तर २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात ५३.५१% महाराष्ट्रात तर देशात ६१% मतदान झाले आहे.  इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्याला आपण सुशिक्षित, साक्षर, सर्व सुविधायुक्त असा राज्य म्हणून ओळखतो. परंतु भारतातील एकूण राज्यांचा विचार केला असता महाराष्ट्रात सातत्याने मतांची टक्केवारी घसरत आहे. पहिल्या टप्प्यांमध्ये त्रिपुरा हा छोटासा राज्य सर्वाधिक ७९.९०% मतदान करतो. त्याचवेळी बिहारमध्ये सर्वात कमी ४७.४९% मतदान होते. तर दुसऱ्या टप्प्याचा विचार केला असता याही टप्प्यात सर्वाधिक मतदान ७७.५३% हे त्रिपुरा या राज्यात होतो तर सर्वात कमी उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये ५२.७४% मतदान झाले आहे.

   आपण जर वरील आकडेवारीकडे लक्षपूर्वक पाहिले असता असे जाणवते की, भारत देशात पहिल्या टप्प्यापेक्षा २ ते ३ टक्क्यांनी मतदान दुसऱ्या टप्प्यात कमी झाले आहे. म्हणजे मतदानाच्या टक्केवारी सातत्याने घट होताना दिसते आहे. ही घट नेमकं कोणत्या कारणामुळे होत आहे, याचा जर आपण विचार केला तर असे लक्षात येते की, १) प्रचंड तापमान - सध्या देशात प्रचंड तापमान जाणवत आहे, उष्णता अधिक आहे, उष्माघात होण्याचे प्रमाण अधिक आहे त्यामुळे मतदानावर त्याचा परिणाम होताना दिसतो. २) उन्हाळा म्हटलं की लग्न आले, म्हणजेच काय तर सध्याच्या परिस्थितीत लग्न सराई असल्यामुळे देखील मतदानावर परिणाम होत आहे असं निवडणूक आयोगाच्या सदस्यांनी सांगितले आहे. ३) प्रचंड नैराश्यता - भारतातील मतदारांमध्ये राजकीय पक्षातील नेत्यांबद्दल रोष आहे. या रोषाचा परिणाम म्हणजे मतदान करण्यात उत्साहाचा अभाव जनतेत दिसून येतो.  ४) शहरी भागात सर्वाधिक उदासीनता - शहरी भागातील मध्यमवर्गीय लोक संपत्ती कमावणे व घर-प्रपंच चालवण्यात व्यस्त आहेत. त्यांना या मतदानाशी काही एक संबंध नसल्यासारखे दिसते‌. मतदानाच्या दिवशी सुट्टी भेटली म्हणून 'पर्यटन' करतात. त्यामुळे देखील शहरी भागात मतदानाचा टक्का घसरताना दिसून येतो. ५) धार्मिक द्वेष - आज भारतात प्रचंड प्रमाणात जातीय, धार्मिक द्वेष राजकीय पक्षांकडून पसरवले जात आहे. त्यामुळे देखील मतदार मतदानापासून लांब राहण्याचा प्रयत्न करत आहे. ६) पक्षाचे केंद्रीकरण - आज भारतामध्ये जवळपास कमी-अधिक प्रमाणात सर्वच पक्ष केंद्रीय पद्धतीने निर्णय घेत आहे. हुकूमशाही पद्धतीने एकला चलो ही भूमिका घेताना दिसते आहे. त्यामुळे देखील मतदार या केंद्रिकरणास फाटा देत मतदान न करण्याचा विचार करत असल्याचे दिसून येते. ७) सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रात मागील दोन वर्षात महाराष्ट्रात लागलेली कीड;  पक्षांतर्गत बंड यामुळे जनता त्रासली आहे. हे राजकीय नेते मंडळी स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष फोडून गटा-तटाचे राजकारण करत आहे. एका पक्षातून फुटून दुसरा गट निर्माण केला जातं आणि त्यावेळी ते सांगतात की, "आम्ही विकासासाठी इकडे आलो". म्हणजे याचा अर्थ त्यांनी त्या अगोदर काहीच केले नाही नुसते आश्वासन दिले. याशिवाय २०२४ च्या निवडणुकीत अनेक भाजपचे नेते राज्यघटना बदलणार असे बोलत असल्यामुळे आरक्षण जाण्याच्या भीतीने देखील सामान्य जनता मतदानापासून वंचित राहत असल्याचे सांगितले जाते. सातत्याने घटणाऱ्या मतदाना विषयी उपाययोजना म्हणून निवडणूक आयोग असेल किंवा राजकीय पक्ष यांनी प्रत्येक तांडा, वाडी, वस्ती व शहरांमध्ये मतदान जागृती घडवून आणली गेली पाहिजे. मतदानाच्या आधीकाराबाबत व त्याचा योग्य वापर केल्यास काय होऊ शकतो, ह्या गोष्टी पटवून दिल्यास भविष्यात मतदानाची टक्केवारी वाढू शकेल.


 
सातत्याने मतदानात होणारी घट ही आजपर्यंतचा इतिहास पाहिला असता असे लक्षात येते की, याचा सर्वाधिक तोटा भारतीय जनता पक्षाला सहन करावा लागला आहे. १९९९ साली ५९.९९% मतदान झाले व भाजपचे १८२ सीट आल्या होत्या. २००४ साली ५८.०७% मतदान व १३८ सीट आले. २००९ साली ५८.२१% मतदान व ११६ सीट आले. २०१४ साली ६६.४४% मतदान व २८२ सीट आले. २०१९ साली ६७.४०% मतदान व ३०३ सीट आलेल्या होत्या. २०१४ व २०१९ अपवाद वगळता त्यापूर्वी ५० ते ५८% च्या आसपास मतदान होत असे; परंतु या दोन्ही वर्षी मतांची टक्केवारी वाढली होती. त्यामुळे याचा फायदा भाजपला झाला होता. त्यामुळे याही वर्षी जर मतदानाचे प्रमाण पहिल्या व दुसऱ्या टप्प्यासारखेच पुढील पाच टप्प्यात मतदानात घट झाल्यास भाजपला याच्या परिणामास सामोरे जावे लागेल असे राजकीय विश्लेषक सांगतात. मतदान सर्वाधिक झाल्यास कोणत्या पक्षाला अधिक फायदा होईल किंवा कोणत्या पक्षाला तोटा होईल, यापेक्षा सुदृढ लोकशाहीसाठी व लोकशाही जिवंत राहण्यासाठी १००% मतदान होणे अपेक्षित आहे. परंतु या दोन टप्प्यातील आकडेवारीचा अंदाज पाहता मतदार हे जुन्या आकडेवारीकडे येऊ पाहत असल्याचे दिसते. आणि हे सातत्याने घडणारी मतांची आकडेवारी लोकशाहीसाठी मारक नक्कीच ठरेल. त्यामुळे निवडणूक आयोगाने देखील राहिलेल्या पाच टप्प्यांमध्ये मतांची टक्केवारी वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आवश्यक आहे.


बळीराम शेषेराव चव्हाण, पीएच.डी, राज्यशास्त्र,

जहागीरदारवाडी (तांडा), धाराशिव (उस्मानाबाद) 

मो. ९०२८४४६९४२

टिप्पण्या

  1. माझ्या मते पक्षाचे झालेले केंद्रीकरण व सद्यस्थिती अतिशय खालच्या तळाला गेलेली राजकारणाची पातळी...या बाबी मतदानाचा टक्का कमी होण्यास कारणीभूत आहेत.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंजारा समाजाला ST आरक्षण मिळावे

सावित्री ज्योती व आजच्या स्त्रिया

कृषी क्रांतीचे जनक वसंतराव नाईक